Navi mumbai Youth alive after heart attack : आपल्या आयुष्यात कधी काय होईल याचा काही नेम नाही. आजकाल प्रत्येकाचं रुटीन श्येड्युल इतकं बदललं आहे की, झटक्यात एखाद्याच्या तब्येतीवर काय आणि कधी परिणाम होईल हे सांगता येत नाही. आजकाल तर बदलत्या लाइफस्टाइलमुळे हृदयविकाराशी संबंधित अनेक घटना सतत कानावर येत आहेत. बसल्या जागी हृदयविकाराचा झटका येणे, झोपेत झटका येणं या घटना सतत घडताना दिसतात. वेळीच उपचार घेत यातून अनेकजण बचावलेही आहेत, मात्र योग्य त्या वेळी उपचार न मिळालेल्यांना प्राणही गमवावा लागला आहे. अचानक ओढवलेल्या या आघाताच्या समस्येतून अनेकांना चमत्कार झाल्याचेही जाणवले आहे. हो. असाच एक चमत्कार घडला आहे नवी मुंबई येथील तळोजा येथे.
नवी मुंबईतील तळोजा येथे एका 32 वर्षीय युवकाबरोबर घडलेल्या घटनेने अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली. या युवकाला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तब्बल १५ मिनिटे हृदय बंद होते आणि मग चमत्कारच झाला. योग्य त्या वेळी हॉस्पिटलमध्ये गेल्याने त्या युवकाचा जीव वाचला. अनिकेत नलावडे असे या युवकाचे नाव आहे. तळोजा येथील 32 वर्षीय रहिवाशी अनिकेत नलावडे याला गाडी चालवताना हार्ट अटॅक आला. यावेळी त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि अपघात झाला. झालेल्या अपघातात दुर्देवाने एकाचा मृत्यू झाला. मात्र, या अपघातात १५ मिनिटांच्या वर हृदय आणि बीपी पुर्णपणे बंद राहून अनिकेत नलावडे यांचा चमत्कारिकरित्या जीव वाचलेला आहे.
घरात छातीत दुखायला लागल्यानंतर अनिकेत नलावडे पत्नीला घेऊन कार चालवत हॅास्पीटलमध्ये जात होता. पण, कळंबोली जवळ पोहोचताच त्याच्या छातीत कळा सुरु झाल्या आणि त्याला ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. यावेळी त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. दरम्यान, झालेल्या अपघातात त्याने एका दुचाकीस्वराला उडवले. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला असल्याचं समोर आलं आहे.
आणखी वाचा – आई-बापाच्या विरोधात लग्न करण्याची हिच शिक्षा का?, वैष्णवीने बाळाचाही विचार न करता…
‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने अनिकेतची भेट घेतली आहे आणि त्याची त्यांनी प्रतिक्रिया घेतली. यावेळी बोलताना अनिकेत म्हणाला, “आता मला बरं वाटतंय. ही डॉक्टरांची कृपा आहे. योग्य त्यावेळी त्यांनी औषधोपचार केले त्यामुळे माझा जीव वाचला. त्यांच्यामुळेच लवकरात लवकर बरे होण्यासाठी मला मदत झाली. हृदय बंद झाले, बीपी मिळत नव्हता या माझ्या क्रिटिकल कंडिशनबाबत मला डॉक्टरांकडून नंतर कळालं, आणि यासाठी मी डॉक्टरांचे आभार मानतो”.