मराठी चित्रपटसृष्टीत अनेक नामवंत दिग्दर्शक आहेत, जे त्यांच्या अफाट कलाकृती व उत्तम दिग्दर्शनासाठी ओळखले जातात. त्यातील काही दिग्दर्शकांनी थेट राष्ट्रीय पुरस्कारांवर नाव देखील कोरले आहे. असेच एक दिग्दर्शक आहे, ज्यांनी नुकताच राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे. ते दिग्दर्शक म्हणजे निखिल महाजन. निखिल महाजन यांना ‘गोदावरी’ चित्रपटासाठी यंदाचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे, त्यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. (Director Nikhil Mahajan at Shah Rukh Khan Mannat House)
‘बाजी’, ‘जून’, ‘पुणे ५२’, ‘गोदावरी’ यांसारख्या अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या निखिल महाजन यांना या क्षेत्रात येण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. त्यांच्या संघर्षाच्या काळात जेव्हा ते निराश व्हायचे, तेव्हा ते किंग खान शाहरुख खानच्या ‘मन्नत’ या बंगल्याबाहेर रात्रभर बसायचे. पण जसजसा काळ पुढे गेला, तसा त्यांच्यासाठी थेट ‘मन्नत’चा दरवाजा उघडला. हा किस्सा खुद्द निखिल महाजन यांनी एका मुलाखतीत सर्वांसमोर शेअर केला आहे.
हे देखील वाचा – अमीषा पटेलसाठी गेल्या २० वर्षांपासून नवरा शोधतोय संजय दत्त, अभिनेत्री म्हणते, “माझं लग्न करण्यासाठी तो…”
दिग्दर्शक निखिल महाजन म्हणाले, “मी शाहरुख खानचा चाहता आहे. त्यामुळे जेव्हा मी निराश असायचो, तेव्हा मी शाहरुखच्या ‘मन्नत’ बंगल्यासमोर जाऊन बसायचो. कदाचित तो माझी प्रेरणा आहे. पण हीच प्रेरणा मला ‘मन्नत’च्या बाहेरून आत घेऊन गेली. ज्या ‘मन्नत’समोर मी अनेक रात्र घालवली, त्याच ‘मन्नत’चे दरवाजे एके दिवशी माझ्यासाठी उघडले. याचे कारण होते, ते ‘बेताल’ वेब सीरिज. या वेबसीरिजचे वाचन आम्ही शाहरुखसमोर त्यांच्या घरी बसून केलं. तीच माझी त्यांच्याशी झालेली पहिली भेट.”
हे देखील वाचा – खून, वाद-विवाद, गुन्हेगारी अन्…; ६०च्या दशकातील गँगस्टर दुनिया, ‘बम्बई मेरी जान’चा ट्रेलर पाहिलात का?
“पुढे वेबसीरिजचं वाचन सुरू झालं आणि शाहरुख यांनी स्वतःची एक डायरी काढत त्यात काहीतरी लिहायला सुरुवात केली. त्यांनी आम्हाला कुठेही थांबवलं नाही. वाचन पूर्ण होईपर्यंत ते डायरीमध्ये काही ना काही लिहित होते. सर्व झाल्यावर त्यांनी स्वतःच्या डायरीतील त्यांचे मुद्दे, चांगलं-वाईट सर्व आमच्यासमोर ठेवलं. तेव्हा त्यांच्यातील अभ्यासू फिल्ममेकरची प्रत्यक्ष भेट झाली. यशराज स्टुडिओमध्ये चित्रीकरण करत असताना बराच काळ मला शाहरुख सरांबरोबर व्यतित करता आला, शिकता आलं. मी आजही ‘मन्नत’बाहेर जाऊन बसतोच. पण माझ्या करिअरमधील पडत्या काळात ‘मन्नत’चे दरवाजे उघडणं, हे मी ‘सूचक’ समजतो की जे काम मी करत आहे, ते योग्य आहे.”, असे निखिल महाजन म्हणाले.