‘बिग बॉस मराठी’ सुरु झाल्यापासून निक्की तांबोळी व वर्षा उसगांवकर या दोन स्पर्धकांमध्ये नेहमीच वाद झालेले पाहायला मिळाले. अगदी पहिल्या दिवसापासून निक्कीने वर्षा यांचा अपमान केला. त्यावरुन निक्कीला प्रेक्षकांनीही ट्रोल केलं. शिवाय रितेश देशमुखनेही निक्कीची शाळा घेत तिला वर्षा यांची माफी मागायला लावली. यानंतर आता निक्कीने थेट वर्षा यांच्या मातृत्त्वावर भाष्य केलं आहे. एखाद्या स्पर्धकाच्या खासगी गोष्टीवर भाष्य करणं चूक आहे. आणि तीच चूक निक्कीने केल्याने तिच्यावर एक मराठमोळा अभिनेता भडकला आहे. हा अभिनेता म्हणजे अभिजीत केळकर. (Abhijeet Kelkar Angry Post)
“एखाद्या बाईच्या मातृत्वावर बोलताना ती कधी आई झाली आहे की नाही आणि ते आपल्याला माहीत आहे की नाही हे कसं मॅटर करतं?. मुळात दुसऱ्याच्या इतक्या खासगी व संवेदनशील विषयावर बोलणाऱ्या माणसांचं मानसिक आरोग्य पुन्हा एकदा तपासायला हवं. पण वर्षा ताई, तुमच्या संयमाला सलाम”, असं म्हणत त्याने निक्कीला सुनावलं आहे, तर इतकं ऐकूनही संयम दाखवल्याने त्याने वर्षा यांचं कौतुक केलं आहे. “वर्षा ताई, तुमच्या संयमाला सलाम. शाब्बास अंकिता, तू करेक्ट स्टँड घेतलास”, असं कॅप्शन देत त्याने ही पोस्ट शेअर केली आहे.
टास्क सुरु असताना निक्कीने ‘टीम बी’च्या सदस्यांच्या बाहुलीचा एक पाय तोडला. त्यामुळे वर्षा यांनी, “निक्कीने बाहुलीची मुंडी काय, तंगडं तोडलं” असं म्हटलं. यावर प्रतिउत्तर देताना निक्की म्हणाली, “यांच्या भावना बघितल्या का? आईचं प्रेम कसं समजेल जाऊदेत…”. निक्कीचं हे वाक्य ऐकताच अंकिता प्रचंड भावुक झाली आणि ती रागात निक्कीला म्हणाली की, “ए… तुझं हे बोलणं अतिशय चुकीचं आहे. आताच ‘बिग बॉस’ म्हणाले… हा मानवी भावनांचा खेळ आहे आणि मॅमना तू हे असं बोलत आहेस… ते सहन होणार नाही. त्यांच्या मातृत्त्वावर जाऊ नकोस. निक्की तू चुकीचं बोलत आहेस”. अंकिता भडकल्यावर निक्की तिला म्हणते, “हे तू मला सांगू नकोस… या स्वत:च तंगडं तोडलं म्हणाल्या आणि मला भावनांबद्दल सांगतात.” निक्कीचा हा अरेरावीपणा पाहून वर्षा यांनी म्हटलं, “तू जे केलंय तेच मी सांगितलं… शब्द हे बाणासारखे असतात आणि ते परत घेता येत नाहीत एवढं लक्षात ठेव निक्की, एकदा बाण गेला की गेला”.
आणखी वाचा – “दोन आठवडे थंड होतास आता…”, विशाखा सुभेदारांची पॅडीसाठी पोस्ट, म्हणाल्या, “भांडणातही तू…”
दुसऱ्या दिवशी निक्कीने घडल्या प्रकाराबद्दल वर्षा उसगांवकरांची माफी मागितली. यावेळी तिने “मॅम मी जे काल बोलली त्यासाठी माफी असावी. मला वाईट वाटलं, तुमच्याशी कसं बोलू मला कळत नव्हतं. पण मी धीराने तुमच्यासमोर आता आलीये आणि मी आईबद्दल जे काही बोलली त्यासाठी मनापासून सॉरी” असं म्हणत त्यांची माफी मागितली. यावर वर्षा उसगांवकरांनीदेखील “तू बोललीस ते अक्षम्य आहे पण, ठिक आहे ” असं म्हटलं. दरम्यान, या प्रकरणानंतर प्रेक्षकांमध्ये निक्कीबद्दल प्रचंड राग व वर्षाउसगांवकरांबद्दल सहानुभूती आहे. तसंच अनेकांनी याबद्दल आपली नाराजी व्यक्त केली आहे.