मराठी मालिका तसेच ‘बिग बॉस मराठी’मुळे चर्चेत आलेला अभिनेता आस्ताद काळे सध्या एका कठीण प्रसंगाचा सामना करत आहे. काही दिवसांपूर्वी आस्तादची आई सुनिता काळे यांचं निधन झालं असल्याची बातमी समोर आली. आस्तादचे वडील प्रमोद काळे यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटद्वारे पत्नीसह काही फोटो शेअर केले होते. फोटो शेअर करत त्यांनी पत्नीसाठी भावुक पोस्टही शेअर केली. दरम्यान आस्तादने आता त्याच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. त्याने सोशल मीडिया अकाऊंटद्वारे आईसाठी खास मॅसेज लिहिला आहे. (Aastad Kale Mother Passed Away)
आस्तादने फेसबुकद्वारे दोन पोस्ट शेअर केल्या. एका पोस्टमध्ये त्याने म्हटलं की, “…म्हणूनी…घनव्याकुळ मी रडलो नाही अजून…”. तर दुसऱ्या पोस्टमध्ये त्याने “ती गेली तेव्हा…” असं म्हटलं आहे. या दोन्ही पोस्टवरुन आस्तादच्या आताच्या कठीण काळाबाबत चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच त्याच्या पोस्टनंतर कमेंटद्वारे सुनिता काळे यांना नेटकऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. पण त्याच्या आईचं निधन नेमकं कशामुळे झालं हे अद्यापही समोर आलेलं नाही.
आणखी वाचा – “मी रडत आहे…”, मुग्धा वैशंपायनला सासरच्या घरी गृहप्रवेश करताना पाहून बहीण भावुक, कमेंट करत म्हणाली…
आस्तादच्या वडिलांनी पत्नीबरोबरचे अगदी गोड फोटो शेअर केले. या फोटोमध्ये दोघंही अगदी आनंदी दिसत आहेत. तसेच त्यांनी फोटोद्वारे दोघांच्या ट्रीपचे काही आठवणीत राहणारे क्षण सगळ्यांसमोर आणले. प्रमोद काळे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. पत्नीच्या निधनानंतर तेही अगदी कोलमडून गेले आहेत. तसेच पत्नीच्या आठवणीत भावुक झाले आहेत.
आस्तादच्या पोस्टनंतर कलाक्षेत्रातील काही मंडळींनी त्याला स्वतःची व कुटुंबाची काळजी घेण्याचा सल्ला दिला. अभिनेते प्रवीण तरडेंनीही कमेंट केली. ते म्हणाले, “मित्रा काळजी घे”. तसेच चाहत्यांनीही हळहळ व्यक्त केली आहे.