Vaishnavi Hagwane Death : एकदा का लग्न करुन मुलगी सासरी गेली की आई-वडिलांच एक काळजी मिटली. मुलीचं लग्न झालं की आम्ही निवांत असं अनेक आई-वडिलांचं म्हणणं आजही असतं. पण सध्याच्या युगात हे चित्र काहीस बदललेलं दिसत आहे. लेक सासरी गेली की तिला सासरचे कसे नांदवतील, तिचा जाच तर होणार नाही ना?, तळहाताच्या फोडासारख्या जपलेल्या त्या फुलाला सासरचे किती सांभाळून घेतील ही हुरहूर आई-बापाच्या जिव्हारी आहेच. आणि लेकीच्या संसाराची भीती वैष्णवी हगवणेच्या कुटुंबियांना लग्न झाल्यापासूनचं होती. लेकीचा संसार वाचावा म्हणून सासूचे, नणंदेचे पाय धरणाऱ्या त्या आई-वडिलांवर काय बेतलं असावं याची कल्पनाही करवत नाही.
सासरच्या जाचाला कंटाळवून काही दिवसांपूर्वी पुण्यातील पिंपरी-चिंचवड भागातील वैष्णवी हगवणेने आत्महत्या केली. आज या हत्येला पाच दिवस उलटले असले तरी अद्याप आरोपी फरार. हो, म्हणजे सासरचे मंडळी. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुळशी तालुक्यातील पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची ही सून. नामांकित कुटुंबात घडलेली ही लाजिरवाणी गोष्ट. सध्या ही बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली आहे. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिच्या पती, सासू, नणंद यांना अटक केली आहे. मात्र, सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर फरार असल्याचं समोर आलं आहे. यावरुन राजकीय वरदहस्त असल्यानं त्यांना अटक होत नाही का?, हा सवाल उपस्थित केला जात आहे.
आणखी वाचा – पहलगाम हल्ल्यावर बॉलिवूड शांत का?, सुनील शेट्टी स्पष्टच बोलले, म्हणाले, “बोललं की शिवीगाळ होते आणि…”
वैष्णवी-शशांक यांचा २०२३ मध्ये प्रेमविवाह झाला होता. वैष्णवीच्या माहेरच्यांनी लग्नात ५५ तोळे सोने, एक आलिशान चारचाकी गाडी, चांदीची भांडी भेट म्हणून दिली आणि सुसगाव येथील सनीज वर्ल्डमध्ये लाखो रूपये खर्च करुन शाही थाटामाटात विवाह आयोजित केला होता. लग्नाच्या काही दिवसांतच वैष्णवीच्या सासरच्यांनी त्यांचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली. चारित्र्यावर संशय घेऊन मानसिक, शारीरिक छळ, अपमानास्पद वागणूक, अश्लील भाषा वापरत तिचा छळ सुरु ठेवला.
नुकतीच वैष्णवीच्या आई-वडिलांनी ‘एबीपी माझा’ला मुलाखत दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले, “आम्ही आमच्या मुलीचा संसार वाचवायचा खूप प्रयत्न केला. अगदी तिच्या सासूचे, नणंदेचे पाय धरले, पण शेवटी व्हायच तेच झालं. गेल्या महिन्यात तर तिला तिच्या नणंदेने खूप मारलं, अपशब्द वापरले, इतकंच नाही तर तिच्या तोंडावर थुंकली. लग्नानंतर वैष्णवी जेव्हा केव्हा माहेरी यायची तेव्हा ती ५० हजार, १ लाख रुपये मागायची आणि आम्ही पण लेकीसाठी म्हणून देत गेलो. पण लग्नानंतर तिने सासरच्या सांगण्यावरुन पैशांची मागणी सुरूच ठेवली”.
आणखी वाचा – Viral Video : भर रस्त्यात नवऱ्याकडून पत्नीला मारहाण, बाळालाही फेकलं अन्…; पालक म्हणून हरले…
वैष्णवीच्या आठवणीत तिचे आई-वडील भावुक झाले होते. डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत असताना तिचे वडील म्हणाले, “लग्नानंतर येणाऱ्या श्रावण महिन्यात तिच्या सासरकडून चांदीची भांडी, चांदीची मूर्ती मागितली. तेव्हा आम्ही पाच-सहा किलोची ती मूर्ती दिली. आणि पाच चांदीची ताट आणि इतर भांडी असा सेट दिला. आता गेल्या महिन्यातच मी त्यांना दीड लाखाचा फोन घेऊन दिला. दोन-तीन महिन्यांपूर्वी जावयाने माझ्याजवळ दोन कोटींची मागणी केली, हा या घटनेतील महत्त्वाचा मुद्दा आहे”. लेकीच्या जाण्याने वैष्णवीचे वडील पुरते कोलमडून गेलेले पाहायला मिळाले. लेकीच्या मृत्यूचा न्याय त्यांना हवा होता ही एकच आशा त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती.
यानंतर तिच्या आईला वैष्णवीच्या मानसिकतेबाबत विचारले तेव्हा त्यांचाही कंठ दाटून आला. त्या म्हणाल्या, “लग्न झाल्यावर सुरुवातीचे काही दिवस वैष्णवी आम्हाला काहीच बोलली नाही. कारण तिने तिच्या मानाने साथीदार निवडला होता आणि लग्न केलं होतं. आम्हाला त्रास होईल म्हणून ती काहीच बोलली नाही. पण जेव्हा श्रावणात गौरी माहेरहून देण्याची वेळ आली तेव्हा आम्ही मातीच्या मूर्ती देतात असं सांगितलं. तेव्हा तिने चांदीच्या मूर्ती मागितल्या आहेत असं म्हणत इतके दिवस जे घडत होतं ते सांगितलं, आणि त्यांनतर हळू हळू गोष्टी उलगडत गेल्या”.