मालिका व चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणारा अभिनेता शशांक केतकर त्याच्या चॉकलेट बॉय लूकसाठी ओळखला जातो. ‘होणार सून मी या घरची’ मालिकेतून शशांकने कलाक्षेत्रात पदार्पण केलं. पुढे त्याने अनेक मालिका व चित्रपटांमधून विविध भूमिका साकारल्या आहे. त्याचा पडद्यावरील अभिनयाला प्रेक्षकांकडून नेहमीच शाबासकीची थाप मिळाली आहे. मराठी कलाक्षेत्र गाजवणाऱ्या अभिनेत्याने ‘स्कॅम २००३’ या हिंदी वेबसीरिजमधून ओटीटी क्षेत्रात पदार्पण केले आहे. त्याने साकारलेल्या ‘जेके’ या महत्वपूर्ण भूमिकेचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले. (Shashank Ketkar statement on marathi actors)
शशांकने नुकताच ‘मुंबई टाईम्स’ला एक मुलाखत दिली. यावेळी वेबसीरिजमध्ये काम करण्याचा अनुभव सांगताना त्याने मराठी कलाकारांबाबत एक विधान केलं आहे. ‘स्कॅम २००३’ वेबसीरिजमध्ये गगन देव रियार प्रमुख भूमिकेत आहे. तर शशांकसह भरत जाधव, समीर धर्माधिकारी, नंदु माधव, भरत दाभोळकर सारखे मराठीतील अनेक नावाजलेल्या कलाकारांनीही मुख्य भूमिका साकारली आहे.
हे देखील वाचा – Video : लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत मायरा वायकुळचा भन्नाट डान्स, वडिलांसह मजा-मस्ती केली अन्…
या दिग्गजांबरोबर काम करण्याचा अनुभव सांगताना शशांक म्हणाला की, “मराठी कलाकार त्यांना दिलेलं पात्र एका टेकमध्ये प्रभावीपणे साकारू शकतात, हे हिंदीतील दिग्दर्शकांना माहिती आहे. त्यामुळे माध्यम कोणतंही असलं तरी अनेकदा मराठी कलाकारांशिवाय पर्याय नसतो.” त्याचबरोबर मराठी कलाकारांबरोबर स्क्रीन शेअर करण्याबद्दल अभिनेता म्हणाला की, “‘स्कॅम २००३’मध्ये भरत जाधव, नंदु माधव, भरत दाभोळकर, समीर धर्माधिकारी आणि विद्याधर जोशी अशी दिग्गज कलाकार मंडळी असल्यामुळे शूटिंगच्या ठिकाणी अगदी खेळीमेळीचं आणि घरच्यासारखं वातावरण होतं.”
हे देखील वाचा – प्रभासच्या बहुप्रतीक्षित ‘सालार’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर, शाहरुख खानच्या ‘डंकी’शी होणार टक्कर
दरम्यान, ही वेबसीरिज करत असताना शशांकला ‘मुरांबा’ मालिकेच्या निर्मात्यांची मोलाची साथ मिळाली. शिवाय, त्यांनीही या भूमिकेचे भरभरून कौतुक केल्याचं सांगितलं. “जेव्हा ही वेबसीरिज करत होतो, तेव्हा ‘मुरांबा’च्या प्रोडक्शन हाऊसची साथ मिळाली. त्यांनीदेखील माझ्या भूमिकेचे कौतुक केलं. दोन्ही निर्मिती संस्थांनी मला सांभाळून घेतल्यामुळे ‘स्कॅम २००३’मध्ये काम करताना आणखी मदत झाली.”, असे शशांकने सांगितलं.