मनोरंजनसृष्टीत दररोज नवनवीन चेहरे दाखल होत असतात. परंतु ज्यांच्याकडे ‘टॅलेन्ट’ आहे तेच टिकून राहतात. एक नवा मराठमोळा चेहरा मनोरंजनसृष्टीत झेपावू पाहतोय, तो म्हणजे अपूर्वा कवडे. अपूर्वा ने ‘मिस फॅब’ सौंदर्यस्पर्धेत ३रा क्रमांक पटकावत ‘ग्लॅमर’ च्या दुनियेत पदार्पण केलं. 

साहजिकच तिला फॅशन शोज मधून ‘रॅम्प-वॉक’ करण्यासाठी निमंत्रणं येऊ लागली. तिने मुंबई, गोवा येथील फॅशन शोज तर केलेच परंतु थायलंड मधील आंतरराष्ट्रीय फॅशन शोज मधेही आपली चमक दाखविली आहे. फॅशन शोज च्या दुनियेत अपूर्वा चे नाव आता प्रस्थापित झाले आहे. 

अनेक मॉडेल्सचा सौंदर्यस्पर्धा व फॅशन शोज नंतर पुढचा टप्पा अभिनयक्षेत्र असते. अपूर्वा कवडे ने अभिनय केलेला ‘चिंध्या’ नावाचा लघुपट २०१७ साली सर्वोत्कृष्ट लघुपटासाठी नॉमिनेट झाला होता. अशा आशयघन चित्रपटाचा भाग होणं हे तिच्या अभिनयक्षमतेबद्दल बरेच काही सांगून जाते. 

तिने नुकताच एक हिंदी चित्रपट केलाय. ‘शुभरात्री’ या चित्रपटात ती प्रमुख भूमिका करीत असून तिच्यासोबत मेहुल गांधी व शाहिद मल्ल्या महत्वपूर्ण भूमिकांत आहेत. वर्षा उसगावकर व अनुपसिंग ठाकूर सारख्या दिग्गज कलाकारांसोबत तिला काम करण्याची संधी मिळाली व तिच्या अनुभवसंपन्नतेत भर पडली याबद्दल ती खूष आहे. 

अपूर्वा एक चांगली अभिनेत्री तर आहेच परंतु ती उत्तम नृत्यांगना सुद्धा आहे. लहानपणापासूनच नृत्याची आवड असणाऱ्या अपूर्वाने ‘बॉलिवूड डान्सिंग स्टाईल’ साठी प्रसिद्ध असलेले गणेश आचार्य यांच्याकडे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलंय. त्याचा फायदा असा झाला झाला की तिला म्युझिक अल्बमसाठी विचारणा झाली. 

तिने ‘सोनिया रांझणा’ हा हिंदी म्युझिक अल्बम केला, ज्यात तिचा अभिनय, नृत्य यांचा संगम बघायला मिळतो. तसेच तिचा अजून एक नवाकोरा मराठी म्युझिक अल्बम येऊ घातलाय. ‘फंडूगिरी’ असे आजच्या पिढीला भावणारे नाव असलेला हा म्युझिक अल्बम मराठीतील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहन सातघरे, ज्यांचा ‘एक होतं पाणी’ नुकताच प्रदर्शित होऊन गेला जो समीक्षकांनी वाखाणला होता, दिग्दर्शित करीत आहेत. अशा नामांकित दिग्दर्शकाबरोबर काम करायला मिळतेय यासाठी अपूर्वा स्वतः या अल्बमचे शूट करण्यास आतूर असून एक तरल अनुभव गाठीशी असेल असे तिचे मत आहे. 

अपूर्वा कवडे ही मराठमोळी अभिनेत्री मराठी व हिंदी मनोरंजनक्षेत्रात मोठी झेप घेताना दिसत आहे.