मालिकेमध्ये काम करणे आणि नाटकांमध्ये काम करणे किती फरक आहे..?

माझी बांधिलकी ही अभिनयाशी आहे त्यामुळे मी कधीच नाटक, मालिका, चित्रपट असा फरक करत नाही. नाटकामध्ये काम करताना कुठलाही वाक्य बोलताना त्यापाठचा लेखकाने सांगितलेला भाव, अचूक संवाद, लांब वाक्यांमध्ये चोरटे श्वास घेणं आणि चेहऱ्यावरचे हावभाव हे अगदी शेवटच्या रांगेत बसलेल्या माणसालाही योग्य दाखवता येणं ह्यासारखी आव्हान असतात तर मालिकेमध्ये तुमचा अभिनय हा जास्तीत जास्त लोकाभिमुख करावा लागतो, त्यात दर आठवड्याला येणारे आकडेदेखील महत्वाचे असतात, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते ह्यांची सांगड घालून अभिनय करावा लागतो. 

माझ्याबाबतीत सांगायचं तर मला 'अश्रू' करत असताना मालिकेतला अभिनय करताना शिकलेल्या गोष्टी खूप कारणीभूत ठरल्या जसे की मालिकेत एखादा सिन करताना त्याच पाठांतर लवकर करावं लागत कधीकधी तर १० मिनिटात सगळं सिन पाठ करावा लागतो. त्यामुळे मेंदूचा कुठलीही गोष्ट ही लवकरात लवकर आणि अचूक करण्याकडे काळ असतो. 'अश्रू' करत असताना त्याचमुळे माझं संपादित केलेलं नाटक सगळं नाटक १० दिवसात पाठ झालं होत. ह्याच श्रेय सगळं मालिकेतल्या अभिनयाला जातं.     

जेव्हा अश्रूंची झाली फुले नाटकाची संधी तुझ्याकडे चालून आली काय भावना होती..?

खूप अवाक झालो होतो ! खरंतर मी नाटकात कधीही काम केलेलं नाही हे माझं पहिलाच नाटकं. मी आणि सुबोध दादा 'तुला पाहते रे'च्या सेटवर एकदा काम करत असताना दादाने मला विचारलं 'प्रथमेश नाटकात काम करणार का ?" मला पहिल्यांदा कळलंच नाही की काय उत्तर द्यावं ? मराठी चित्रपट नाटक आणि मालिका क्षेत्रातले सुपरस्टार सुबोध भावे मला स्वतःहून संधी देत आहेत त्यांच्या बरोबर काम करण्याची म्हटल्याबर कोणत्याही अभिनेत्याचं हे असाच होणार..पण लगेच भानावर येऊन "हो" म्हटलं. "ठीक आहे प्रतिमा फोन करेल तुला" अशी मला ही संधी मिळाली. मला प्रतिमा म्हणजे कोण हे प्रथमतः कळलंच नाही पण नंतर काही दिवसांनी साक्षात त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून 'प्रतिमा कुलकणी' आहेत हे कळल्यावर पोटात गोळा आला. मराठी नाटकातलं चालत बोलत विद्यापीठ आणि विजयाबाई मेहता ह्याच्यासोबत काम केलेल्या बाई..आणि आमच्या नाटकाच्या दिग्दर्शिका..बापरे. पण जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा सगळं दडपण निघून गेलं त्यांनी मला स्वतःहून सगळं काही त्यांच्याकडेच ज्ञान सढळ हस्ते दिलं.

सुबोध भावे सोबत मालिकेत तर काम केलंच आहेस नाटकात काम करतानाचा अनुभव कसा होता..?

माझं हे आयुष्यातील पाहिलं नाटकं. मी ह्या आधी एकाही नाटकात काम केलेलं नाही त्यामुळे थोडासा नर्वस होतो खरा. खरं सांगायचं तर मी सुबोध दादासोबत 'तुपारे'मध्ये काम करत होतो त्यामुळे दडपण केव्हाच निघून गेलं होतं रवींद्र कुलकर्णींनी ह्याआधी तुपारे मध्ये माझ्या बाबांची भूमिका साकारली होती आणि उमेश दादाने (उमेश जगताप) झेंडेची भूमिका साकारल्याने त्यांच्यासोबत काम करण्याची एक वेगळीच मजा होती त्यामुळे तसा कधीच प्रॉब्लेम नव्हता पण मघाशी सांगितल्याप्रमाणे प्रतिमा कुलकर्णीसारख्या प्रथितयश आणि वलयांकित दिग्दर्शकांसोबत मी पहिल्यांदाच काम करत होतो. आणि त्यात भरीला भर म्हणून शैलेश दातार, सीमा देशमुख ह्यांच्यासारखे रंगभूमी कित्येक वर्ष गाजवणारे कलाकार होते त्यामुळे थोडं बॅकफूटवर जाईन असं वाटत होत. पण आनंदाने सांगतो कोणत्याही कलाकाराने मला कधीच असं वाटू दिलं नाही मी नवखा आहे किंवा हे माझं पाहिलंच नाटक आहे. 

माझ्यासोबत काम करणारे माझे सहकलाकार जितेंद्र आगरकर, प्रणव जोशी, भूषण गमरे, रोहित मोरे, श्रद्धा पोखरणकर हे देखील नाट्यक्षेत्रात अनेक वर्ष कार्यरत आहेत आणि अनेक एकांकिका, नाटकं करून अनेक पारितोषिके मिळवली आहेत. परंतु ह्या सगळ्याचा त्यांनी कधीही माझ्यावर परिणाम होऊ दिला नाही की कधी अहंकार पण दाखवला नाही. मी देवाचे ह्याबद्दल नेहमीच आभार मानीन. 

मुख्य म्हणजे सुबोध दादाला तिळमात्रही अहंकार नाहीये त्यामुळे आमच्यावर नकळतच असे संस्कार होतात की ज्याने आम्ही सगळेच माणूस आणि कलाकार म्हणून एक एक पायरी वर चढत जातो आहोत. अजून एक आवर्जून उल्लेख करिन तो म्हणजे आमचे निर्माते अभिजीत देशपांडे, दिनेश पेडणेकर, राहुल कर्णिक आणि मंजिरी भावे ह्यांचा आणि पार्श्वसंगीत करणारे मिलिंद जोशी आणि नेपथ्य आणि प्रकाशयोजना करणारे प्रदीप मुळ्ये ह्यांचा. कपडेपट केला आहे गीता गोडबोले आणि आम्हाला मोलाची साथ करणारी शुभा गोडबोले आणि तावडे काका आणि प्रकाश पाताडे ह्यांचा देखील आणि लास्ट बट नॉट द लीस्ट आमची प्रोडक्शन टीम. आमचा नाटकं ह्यासर्वांमुळे खुलून गेलं आहे आणि आमचं असं एक छोटं कुटुंबच झालं आहे.      
     
प्रयोगाच्या निमित्ताने तुम्ही एकत्र फिरताय एखादा मज्जेदार किस्सा सांगशील का..?

प्रयोगादरम्यान खूप किस्से आहात पण एक मात्र आवर्जून सांगतो दर प्रयोगाच्या वेळी घडणारा.. मी आणि रवींद्र कुलकर्णी ह्यांनी वडील मुलाची भूमिका 'तुपारे' मध्ये केली होती. आणि आमच्या दोघान्मध्ये असणार 'टॉम अँड जेरी'सारखं नातं लोकांनी अक्षरश डोक्यावर घेतलं होत. आमची दोघांचीही एन्ट्री नाटकात एकत्र होते. त्यामुळे आम्ही दोघेही आलो की प्रेक्षकांमध्ये खसखस पिकते.

 दबक्या आवाजात 'ए हे बघ बाप मुलगा आले' असे संवाद सुरु होतात. आम्ही दोघेही ही चुळबुळ खूप एन्जॉय करतो. अजून एक किस्सा सांगतो नुकताच आम्ही पनवेलला प्रयोग केला तेव्हा नाटकात एका पात्राच्या तोंडी वाक्य आहे की "कोण आहे?" आणि तेवढ्यात उमेश जगताप ह्यांची एन्ट्री झाली तेव्हा प्रेक्षकांतून एकजण भर प्रयोगात ओरडला "ए झेंडे आहेत ते" हे ऐकून काही लोक हसायला लागले आम्ही स्टेजवर देखील मनातल्या मनात खूप हसलो..    

प्रयोगानंतर एखाद्या चाहत्याने दिलेली प्रतिक्रिया आठवतेय का..?

हो तश्या तर अनेक आहेत. आमचा पहिला प्रयोग नाशिकला होता. प्राध्यापक वसंत कानेटकर लिखित नाटकं असल्याने आम्ही पहिला प्रयोग नाशिकला त्यांच्या जन्मगावी करण्याचा निर्णय घेतला. नाटासाठी आम्ही पोहोचलो आणि एक बाई ज्या माझ्याशी इंस्टाग्रामच्या माध्यमातून ओळखीच्या होत्या त्या आल्या आणि माझ्या हातावर त्यांनी मिठाई आणि त्यावर प्राजक्ताची फुल ठेवली. माझ्या मनाला ही गोष्ट फारच भावून गेली. कलाकार म्हणून लोक किती प्रेम करतात ह्याची प्रचिती पुन्हा एकदा आली.

 पहिल्या प्रयोगाच्या वेळी प्रत्येक कलाकाराच्या एन्ट्रीला टाळ्या पडत होत्या अत्यंत जादुई वातावरण होता ते. त्यानंतर अहमदनगरला असताना एका मुलीने माझ्यासाठी तिच्या भावना असणार एका तिने स्वतः तयार केलेला ग्रीटिंग घेऊन अली होती. मला ते फारच आवडलं मनातून नकळत शब्द बाहेर पडले...'ह्याचसाठी केला होता सारा अट्टाहास' अनेक ठिकाणी अनेक लोक आमच्यासाठी मिठाई गिफ्ट्स आणि अनेक गोष्टी घेऊन येतात. एखाद्या माणसाच्या आयुष्यात त्याला त्याच्या आप्त लोकांकडून प्रेम मिळताच पण आम्ही कालेलकर किती भाग्यशाली आहोत की आम्हाला इतक्या लोकांचा अगणित प्रेम मिळत..ळूप समाधान वाटत हे अनुभवून..    

२५ प्रयोग नाटकाचे पूर्ण झाले आहेत..एकंदरीतच तालमीत वातावरण कसे असते..?

मगाशी सांगितल्याप्रमाणे हे माझं पहिलाच नाटकं त्यामुळे मी जेवढा जमेल तेवढं शिकण्याचा आणि शिकेल अमलात आणण्याचं काम करतो. बाकी सगळे कलाकार देखील मला प्रत्येक बाबतीत मदत करतात. अगदी स्टेजवर कसे उभे राहावे ह्यापासून ते एक्सिट कशी घावी इथपर्यंत. स्वतः सुबोध दादाने देखील मला अनेक गोष्टी हाताला धरून शिकवलेल्या आहेत. प्रतिमा ताईंनी मला नाटकातल्या प्रत्येक गोष्टीवर बारकाईने विचार करून अभिनय करायला शिकवले आहे. तालिमींदरम्यान एक गोष्ट मात्र दररोज हमखास घडायची ती म्हणजे जेवल्यानंतर काहीतरी गोड खायचंच. मग ते आईसक्रीम असो व मिठाई पण ते आम्ही खाणारच आज कोणी ते स्पॉन्सर कार्याचे ते देखी ठरलेले असे.    

आता अजून पुढे कोणते नवीन प्रोजेक्ट्स घेऊन येणार आहेस..?

सध्यातरी नवीन प्रोजेक्टवर माझा विचार सुरु आहे. नाटकावर लक्ष केंद्रित करण्याचा विचार आहे पण एखादी चांगली संहिता जर चालून आली तरी ती मात्र चित्रपट असो वा सिरीयल नक्की करेन आणि लवकरच मी एका वेगळ्या भूमिकेत देखील तुम्हाला दिसणार आहे ती कोणती ? ते तुम्हाला लवकरच कळेल..तुमच्या शुभेच्छा आणि पाठिंबा असाच असूदेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.