कलाकारांना शूटिंगच्या निमित्ताने नेहमीच आपल्या प्रियजनांपासून लांब राहावे लागते. मग जवळच्या लोकांचे कोणतेही समारंभ असले तरी कलाकार आपल्या कामाला प्राधान्य देतात. याचीच प्रचिती सिद्धार्थ जाधवचे एक ट्विट बघून येत आहे. नुकताच सिद्धार्थ जाधवच्या लेकीचा 'इराचा' वाढदिवस झाला. मात्र सिद्धार्थ त्याच्या 'लग्नकल्लोळ' या आगामी सिनेमाचे शूटिंग करत असल्याने त्याला या वाढदिवसाला उपस्थित राहणे शक्य झाले नाही.

मग काय सिद्धार्थने सोशल मीडियावरून लेकीला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. या संदर्भातला एक व्हीडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये 'लग्नकल्लोळ' चित्रपटाची संपूर्ण टीम आणि कलाकार सुद्धा इराला शुभेच्छा देत आहे.  सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट करून सिद्धार्थने इराला मस्त सरप्राईजच दिले.

सिद्धार्थ त्याच्या 'लग्नकल्लोळ' या आगामी सिनेमाचे कोल्हापूर येथे चित्रीकरण करत आहे. मयूर तिरमखे फिल्म्स निर्मित आणि मोहम्मद बर्मावाला दिग्दर्शित 'लग्नकल्लोळ' हा चित्रपट या  वर्षाअखेरपर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, सिद्धार्थ सोबतच मयुरी देशमुख, भूषण प्रधान हे या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत आहेत. 

डॉ. मयूर तिरमखे, अण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगलाबाई अण्णासाहेब तिरमखे यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी दिलशाद शेख यांनी सांभाळली असून चित्रपटाचे लेखन जितेंद्र परमार यांनी केले आहे. डीओपीचे काम दिलशाद. व्हीए यांनी पाहिले आहे.