जून महिना म्हंटला कि सगळ्यांना आतुरता असते ती पावसाची पण चित्रपटप्रेमींना आतुरता असते ती गोवा मराठी चित्रपट महोत्सवाची. ह्यावर्षी १२ वा गोवा मराठी चित्रपट महोत्सव साजरा होणार आहे. खरंतर गेले ११ वर्ष गोवा मराठी चित्रपट महोत्सव मराठी चित्रपटांसाठी नेहमीच हक्काने उभा राहिला आहे,मराठी चित्रपटाला हक्काचे स्थान ह्या महोत्सवाने दिले आहे. ह्यावर्षी २८,२९ आणि ३० जूनला हा महोत्सव भन्नाट चित्रपटांची मेजवानी घेऊन आपल्या समोर येणार आहे. 

गोवा मराठी चित्रपट महोत्सवाची एक खास बात म्हणजे ह्या महोत्सवात निवडले जाणारे चित्रपट हे उत्तम तर असतातच पण त्या चित्रपटामधून एक सामाजिक संदेशही दिला जातो आणि अश्या चित्रपटांना गर्दी नाही होणार असं शक्यच नाही. गोव्यातील चित्रपटप्रेमींसाठी हे ३ दिवस उत्साहाने परिपूर्ण असे असतात. 

गोवा मराठी चित्रपट महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून सुभाष घाई उपस्थित राहणार आहे.तसेच यंदाचा कृतज्ञता पुरस्कार मराठी चित्रपट दिग्दर्शिका तसेच राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुमित्रा भावे यांना देण्यात करण्यात येणार आहे. 

महोत्सवाचे संचालक संजय शेट्टी यांनी सांगितले, "गोवा मराठी चित्रपट महोत्सव वाढण्यास आम्हाला आनंद होत आहे. ११ वर्षांपूर्वी चित्रपटप्रेमींसाठी पुढाकार म्हणून आम्ही हे सुरु केले.आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गोवा मराठी चित्रपट महोत्सवा लोकप्रिय झाला आहे. आणि १२ व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवात अजून अनेक सरप्राईज आहेत जे प्रेक्षकांना नक्की आवडतील."

१२ व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवात 

मुळशी पॅटर्न(दिग्दर्शक प्रवीण तर्डे) 
बस्ता(दिग्दर्शक तानाजी धाडगे) 
होडी(दिग्दर्शक गजेंद्र अहीरे)
नाळ(दिग्दर्शक सुधाकर रेड्डी)वे
डिंग चा सिनेमा(दिग्दर्शक सलिल कुलकर्णी)
कागार(दिग्दर्शक मकरंद माने)
सुर सपाटा(दिग्दर्शक मंगेश काथाकाळे) 
भोंगा(दिग्दर्शक शिवाजी पाटील)
दिठी(दिग्दर्शक सुमित्रा भावे)
इमेगो(दिग्दर्शक करण चव्हाण)
खटला बिटला (दिग्दर्शक परेश मोकाशी)
म्होरक्या(अमर देवकर)
मिरांडा हाउस(दिग्दर्शक राजेंद्र तालक)
पाणी(दिग्दर्शक आदिनाथ कोठारे)
चुंबक(दिग्दर्शक संदीप मोदी)
आरोन(दिग्दर्शक ओमकार शेट्टी)
अहिल्या(दिग्दर्शक राजू पार्सेकर) 

आदी सिनेमांची मेजवानी मराठी चित्रपट प्रेमींना चाखता येणार आहे.

4 लघुपट होणार प्रदर्शित

यावेळी चार लघुपट देखील महोत्सवात दाखवले जाणार आहेत.यामध्ये 
पाम्फलेट(दिग्दर्शक शेखर रणखांबे)
पोस्टपार्टुम (दिग्दर्शक विनोद कांबळे)
गोधुळ(दिग्दर्शक गणेश शेलार)
आई शप्पथ (दिग्दर्शक गौतम वझे) यांचा समावेश आहे.

आता पर्यंत पार पडलेल्या 11 गोवा मराठी चित्रपट महोत्सवांना विक्रम गोखले, अमोल पालेकर,सचिन पिळगावकर,नाना पाटेकर,मिलिंद सोमण, श्रेयस तळपदे, महेश मांजरेकर,रवी जाधव,सचिन खेडेकर,वर्षा उसगावकर यांच्या सारख्या अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावलेली आहे.

यंदाचा महोत्सव मराठी चित्रपट प्रेमींसाठी विशेष ठरणार आहे.त्यासाठी नियोजन सुरु आहे.पुढच्या आठवडयात त्याची घोषणा केली जाईल,अशी माहिती महोत्सवाचे संचालक संजय शेट्ये यांनी दिली.यावेळी ज्ञानेश मोघे,श्रीपाद शेट्ये,उदय म्हांबरे,सिद्धेश म्हांबरे उपस्थित होते.


'विन्सन वर्ल्ड' ने कला अकादमीच्या सहकार्याने हा उत्सव आयोजित केला आहे. लवकरच तिकीट बुकिंगसाठी तुम्हाला कळवण्यात येईल. तर ह्या धमाकेदार चित्रपट महोत्सवाचे साक्षीदार होण्यासाठी तुमचे तिकीट bookmyshow वर बुक करू शकता तसेच अधिक माहितीसाठी www.goamarathifilmfestival.com ह्या वेबसाईट ला भेट देऊ शकता.