'हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक गाजलेले चित्रपट दिलेला लोकप्रिय व रसिकांचे भरभरून प्रेम मिळालेला सुपरस्टार संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता यांनी आता मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आहे. ते ‘बाबा’ या त्यांच्या पहिल्या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. 

‘संजय एस दत्त प्रॉडक्शन्स’खाली त्यांनी अशोक सुभेदार व आरती सुभेदार यांच्या ‘ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स’बरोबर त्यांनी चित्रपटाची सह-निर्मिती केली आहे. ‘ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स’ने याआधी ‘बकेट लिस्ट’ या माधुरी दीक्षितची प्रमुख भूमिका असलेल्या तिच्या पहिल्या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती.

‘बाबा’ चित्रपटाचे पहिले पोस्टर आज निर्मात्यांनी प्रकाशित केले. हा चित्रपट २ ऑगस्ट २०१९ रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

‘बाबा’मध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रशिक्षण घेतलेला आणि ‘तनु वेडस मनु’मध्ये प्रमुख भूमिका बजाविलेला दीपक दोब्रियाल मुख्य भूमिकेत असेल. त्याचाही हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. नंदिता धुरी पाटकरसुद्धा या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर, चित्तरंजन गिरी, जयवंत वाडकर आणि लोकप्रिय बालकलाकार आर्यन मेंघजी यांच्याही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज आर गुप्ता यांनी केले आहे. ते ‘बकेट लिस्ट’चे सह-दिग्दर्शक होते. त्यांनी ‘धागा’ या मराठी लघुपटाचे ‘झी५’साठी दिग्दर्शन केले होते.

संजय दत्त यांनी ट्विट करून आपले वडील आणि महान कलाकार सुनील दत्त यांना हा चित्रपट समर्पित केला आहे. "आमचा पहिला मराठी चित्रपट 'बाबा' जी माझ्या मागे प्रत्येक बाबतीत खंबीरपणे उभी राहिली अशा व्यक्तीस समर्पित करत आहोत. लव्ह यू डॅड!," संजय म्हणतो.

मान्यता दत्तने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, "आमचा पहिला मराठी चित्रपट 'बाबा' आम्ही सुनील दत्त साहेबांना समर्पित करत आहोत. त्यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे आमचा आत्मविश्वास नेहमीच द्विगुणित होत गेला."

‘ब्ल्यू मस्टँग क्रिएशन’चे अशोक सुभेदार म्हणाले, “बाबा’ ही मनीष सिंग यांनी लिहिलेली कथा आहे. ती एक वडील आणि त्यांच्या मुलाची कथा आहे. महाराष्ट्रातील निसर्गरम्य अशा कोकणातील एका सुंदर अशा गावात ही कथा आकारली आहे. ही कथा प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकाच्या मनाला भिडेल अशी आहे, कारण त्यात एक साधेपणा आणि सोज्वळता आहे.”

‘बाबा’चे दिग्दर्शक राज आर गुप्ता म्हणाले, “भावनांना भाषा नसते. ही गोष्ट आमच्या चित्रपटातील कलाकारांनी अगदी योग्यपणे अधोरेखित केली आहे. सर्व अडचणीवर मात करून एक कुटुंब एकत्र राहण्याचा कसा प्रयत्न करते, याची ही ‘कडू-गोड’ प्रसंगांनी भरलेली कथा आहे.”