चित्रपट आपल्या आयुष्यातील महत्वाचा भाग मानला जातो. निव्वळ मनोरंजन नव्हे तर समाजप्रबोधनाचे कार्य चित्रपट करतो. त्यामुळे चित्रपट हा समाजाचा आरसा मानला जातो. असेच काही सामाजिक चित्रपट घेऊन ’फक्त मराठी’ आणि ‘विन्सन वर्ल्ड’ यांच्या संयुक्त विद्यमाने १२ व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सव- २०१९ चे  आयोजन केले आहे. हा चित्रपट महोत्सव २८, २९, ३० जून २०१९ रोजी कला अकादमी, मॅकॅनिझ पॅलेस, आयनॉक्स येथे संपन्न होणार आहे. समाजामध्ये घडणाऱ्या वास्तववादी घटना व त्यावर आधारित समांतर चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावेत हे या महोत्सवाचे उद्दिष्ट आहे.     

या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा २८ जून २०१९ रोजी कला अकादमीच्या दिनानाथ मंगेशकर सभागृहात होणार आहे. उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि प्रसिद्ध सिने निर्माते, दिग्दर्शक सुभाष घई यांची उपस्थिती असणार आहे. 

यावेळी मानाचा समजला जाणारा ‘कृतज्ञता पुरस्कार’ यावर्षी नितळ, कासव, वास्तुपुरुष, देवराई यांसारखे दर्जेदार वास्तववादी चित्रपट सिनेसृष्टीला देणाऱ्या प्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांना देण्यात येणार आहे. यावेळी मराठी सिनेसृष्टीचे संपूर्ण तारांगणच या महोत्सवामध्ये अवतरून ह्या महोत्सवाचे सौदर्य द्विगुणित करणार आहेत. 

त्यामध्ये शशिकांत केरकर, संतोष पवार, पंढरीनाथ कांबळे, रमेश वाणी, सुप्रिया पाठारे, कमलाकर सातपुते, मानसी नाईक, पुष्कर जोग, संस्कृती बालगुडे, आशीष पाटील, पूजा सावंत आणि शुभंकर तावडे या कलाकारांचा समावेश आहे.

“गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचे साक्षीदार होणे ही चित्रपट प्रेमीसाठी एक अनोखी पर्वणी असणार आहे. मोठ्या प्रमाणावर लोकांनी या महोत्सवाचा आनंद घ्यावा” असे महोत्सवाचे संचालक संजय शेट्ये यांनी आवाहन केले आहे. तिकीट नोंदणी बुकमायशो वर करू शकता तसेच अधिक माहितीसाठी www.goamarathifilmfestival.com  या वेबसाईटला भेट द्या
  
१२ व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवातील चित्रपट 

मुळशी पॅटर्न(दिग्दर्शक प्रवीण तरडे) 
बस्ता(दिग्दर्शक तानाजी धाडगे) 
होडी(दिग्दर्शक गजेंद्र अहीरे)
नाळ(दिग्दर्शक सुधाकर रेड्डी)
डिंगचा सिनेमा(दिग्दर्शक सलिल कुलकर्णी)
कागर(दिग्दर्शक मकरंद माने)
सुर सपाटा(दिग्दर्शक मंगेश काथाकाळे) 
भोंगा(दिग्दर्शक शिवाजी पाटील)
दिठी(दिग्दर्शक सुमित्रा भावे)
इमेगो(दिग्दर्शक करण चव्हाण)
खटला बिटला (दिग्दर्शक परेश मोकाशी)
म्होरक्या(अमर देवकर)
मिरांडा हाउस(दिग्दर्शक राजेंद्र तालक)
पाणी(दिग्दर्शक आदिनाथ कोठारे)
चुंबक(दिग्दर्शक संदीप मोदी)
आरोन(दिग्दर्शक ओमकार शेट्टी)
अहिल्या(दिग्दर्शक राजू पार्सेकर) 
 
४ लघुपट होणार प्रदर्शित

पाम्फलेट(दिग्दर्शक शेखर रणखांबे)
पोस्टपार्टुम (दिग्दर्शक विनोद कांबळे)
गोधुळ(दिग्दर्शक गणेश शेलार)
आई शप्पथ (दिग्दर्शक गौतम वझे) यांचा समावेश आहे.