आपल्या सगळ्यांचा लाडका ‘मराठी बिग बॉस सिझन २’ सध्या प्रेक्षकांचं मन तर जिंकून घेत आहेच, पण सगळ्यांची उत्सुकताही दर दिवसापासुन वाढवत चालले आहे. सध्या घरात पहिला कॅप्टन कोण होणार यासाठी चुरस लागली होती. टीम ‘वैशाली’ने सर्वांनुमते ‘शिव ठाकरे’च नाव सांगितलं, तर टीम ‘अभिजीत बिचुकले’ने सर्वानुमते ‘नेहा शितोळे’च नाव सांगितलं. घरातल्या पहिल्या कॅप्टन पदाच्या निवडणूकीसाठी ‘नेहा शितोळे’चे ‘अभिजीत बिचुकले’ हे प्रवक्ता होते तर, ‘शिव ठाकरे’ची ‘वीणा जगताप’ ही प्रवक्ता होती. दोन्ही प्रवक्त्यांनी आपापल्या उमेदवाराला कॅप्टन बनवण्यासाठी प्रयत्न केले. पण १२ मतांची आघाडी घेत ‘शिव ठाकरे’ बिगबॉसच्या घरातला पहिला कॅप्टन झाला. 

रविवारच्या डावाला सुरुवात झाली, महेश मांजरेकरांनी सगळ्या सदस्यांचं खुप कौतुक केलं. किशोरी शहाणे, पराग कान्हेरे, वीणा जगताप आणि अभिजीत बिचुकले या चौघांना मुळात बिग बॉसचा खेळ समजला म्हणून त्यांचं विशेष कौतुकही केलं. त्यानंतर महेश सरांनी उगाच कोणाचाही राग कोणालाही दाखवण्याच्या मुद्द्यावरुन रुपालीलाही झापलं. अशा अनेक मुद्द्यांवरुन महेश सर आणि घरातल्या सदस्यांमध्ये चर्चा झाली, प्रसंगी वादविवादही झाले. त्यानंतर महत्वाचा मुद्दा हा होता की आता घरातुन बाहेर कोण जाणार. 

दरम्यान, 'बिग बॉस' च्या घरात पहिल्याच आठवड्यात नॉमिनेशनची प्रक्रिया पार पडली. आपल्या नावडत्या ४ स्पर्धकांची नावं सदस्यांनी सांगायची होती. त्यानंतर नॉमिनेशन प्रक्रियेतून स्वत:ला वाचवण्यासाठी टास्कदेखील देण्यात आले. या सगळ्यानंतर शिव, नेहा आणि शिवानी नॉमिनेट झाले. पण काही ट्विस्ट नसेल तर बिग बॉस कसला, म्हणून महेश सरांनी सरतेशेवटी सांगितलं की पोलिंगच झालं नव्हतं कारण अजुन वोटींग लाईन्स चालू झाल्याच नाही आहेत. 

कोणत्याही नवीन जागेत गेल्यावर तिथे रुळायला काही काळ लागतोच आणि तोच हा काळ होता, आता खऱ्या खेळाला सुरुवात होईल, तसेच सगळ्या नॉमिनेशन प्रक्रियेला सदस्य सामोरे कसे जातात हे यातुन पाहायचं होतं, पण आता पुढच्या आठवड्यापासून एक एक सदस्य घराबाहेर जायला सुरुवात होईल. तोपर्यंत बिग बॉसच्या घरातले हे सगळे कसा खेळ खेळतात हे बघत राहूयात मराठी बिग बॉस सिझन २ मध्ये.