सध्याच्या कोरोना परिस्थितीत प्रत्येक जण मदतीचा हात पुढे करतंय. मराठी कलाकार त्यांच्या सोशल मीडियाचा वापर रूग्णांना बेड्स, ऑक्सिजन, इजेंक्शन मिळावं यासाठी करत आहेत. मदतीचे फोटो ते शेअर करतायेत. याशिवाय रक्तदान करत त्यांनी सर्वात श्रेष्ठदान केलंय. सोशल मीडियावर पोस्ट करत कलारांनी प्रेक्षकांनाही रक्तदान करण्याचं आवाहन केलंय. अभिनेता आकाश ठोसर, तेजस्विनी पंडीत, प्रिया बापट,. उमेश कामत, संदीप पाठक, पुष्कर श्रोत्री यांनी रक्तदान केलं. रक्तदानाचे फोटो शेअर करत आकाश ठोसर म्हणाला, - "आपल्या प्रत्येकाला वाटत असतं की देशासाठी काहीतरी करावं,उपयोगी पडावं. मला लहानपणी पोलीस किंवा आर्मी मध्ये भरती होऊन देशसेवा करायची होती पण ते शक्य झालं नाही.आज कोरोनाच्या लढयात वेगवेगळ्या क्षेत्रातले अनेक लोक आपल्यासाठी झटत आहेत, ते देशसेवाच करत आहेत.. मग आपल्यालाही काय करता येईल ? कोरोना मुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. त्यातच रक्ताचाही तुटवडा भासतोय. १ मे पासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात होत आहे. या काळात १८ वर्षांवरील सर्वांना लस घेता येणार आहे. पण एकदा लस घेतल्यानंतर पुढील ६० दिवस म्हणजेच दोन महिने रक्तदान करता येणार नाही. त्यामुळे या तिसऱ्या टप्प्यात लस घेणाऱ्यांनी आधी रक्तदान करणं गरजेचं आहे. कोरोनातून बरे झालेल्यांनी प्लाझ्मा दान आणि बाकीच्यांनी रक्तदान.. सगळ्यांना आवाहन करूयातच पण आता सर्वात आधी आपल्या स्वतःलाच आवाहन करणं गरजेचं आहे..म्हणजे मग एक साखळी तयार होईल. लोकांना दाखवण्यासाठी नाही तर एकमेकांना प्रेरणा मिळावी हा शुद्ध हेतू ठेऊयात. एकमेकांना मदत करून,जमेल तसा एकमेकांना आधार देऊन आपलं ' रक्ताचं ' नातं अजून घट्ट करूयात.

तर तेजस्वीनीनेही पोस्ट केली होती. अभिमानाने आरशात बघता आलं पाहिजे... - असं माझे बाबा म्हणायचे. झाकल्या मूठीने मदत केली की लोक म्हणणार तुम्ही काहीच करत नाही... केलेली मदत दाखवली की म्हणणार पब्लिसिटी साठी केली.... जमेल तशी केली की म्हणणार एवढीशी का केली ? पण 'तेवढीशी ' का होईना केली ना, किमान हातावर हात धरून तर नाही बसलो....! समाजकल्याण करताना कॅमेरा घरी ठेवायचा. - ( ही पण माझ्या बाबांची शिकवण ) पण आजच्या डिजिटल युगात जाहीर करावं लगतं. कारण कलाकार कॅमेराच्या मागेही अभिनयच करत असतो असं बहुतेकांना वाटतं... पण तसं नाही आहे. आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो ह्याची जाण मला एक कलाकार म्हणून आहे, कारण मुळात कलाकार हा संवेदनशीलच असतो... समाजातील एकाला जरी माझ्या ह्या कृतीतून प्रेरणा मिळाली तरी माणूस म्हणून काहीतरी करू शकले याचं समाधान असेल. आपण चांगलं कर्म करत रहायचा...त्याची नोंद बाकी कुठे नाही, तरी 'तिथे वर' होत असते. तेंव्हा, मला जमेल तसं, जमेल तेंव्हा झाकल्या मूठीने ( जसं गेले अनेक वर्ष करत आले ) आणि आता जमेल तेंव्हा जाहीर करून मदत करत राहीन. कारण मी आजही 'स्वतःला अभिमानाने आरशात बघते., असं तेजस्वीनीने म्हंटलं

तर अभिनेता पुष्कर श्रोत्री म्हणाला-  माझ्यासाठी सर्वात आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे माझ्या मुलीने, शनायाने आयुष्यात पहिल्यांदा रक्तदान केलं! आता म्हणते, वर्षातून दोनदा रक्तदान करणारच!"

 

अभिनेता प्रिया बापट आणि उमेश कामत म्हणाले. आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो. इतकं आपण करायलाच हवं.

तर संदीप पाठकने . सध्या रक्ताची खूप गरज आहे. मी सर्वांना आवाहन करतो की शक्य असेल तर रक्तदान करा. रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान" अशी पोस्ट केली.

याशिवाय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, सोनाली खरे, आरोह वेलणकर या कलाकारांना रक्तदान आणि प्लाझ्मादान करण्याचं आवाहन केलं होतं.

मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांची ही कामगिरी कौतुकास्पद असून सगळीकडून त्याचं कौतूक होतं आहे.