सर्वत्र 'न्यू नॉर्मल' होत असतानाच आता सिनेसृष्टीही पूर्वपदावर येऊ लागली आहे. अनेक चित्रपटांच्या घोषणा होत असून  काही चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. त्यातच आता आणखी एका नवीन चित्रपटाचे टिझर पोस्टर झळकले आहे.  श्री कृपा प्रॉडक्शन निर्मित 'बाबू' या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आले.  पोस्टरवरून हा ॲक्शनपट सिनेमा असल्याचे दिसतंय. दरम्यान, या चित्रपटाच्या अभिनेत्याचे नाव गुलदस्त्यात असून लवकरच ते उघडकीस येईल.


 'बाबू' या चित्रपटाचे दिग्दर्शन मयूर मधुकर शिंदे यांचे असून श्री कृपा प्रॉडक्शन अंतर्गत त्यांचा हा दुसरा चित्रपट आहे. त्यांचा पहिला चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. तर 'बाबू'चे चित्रीकरण लवकरच सुरु होणार आहे. 'बाबू' या चित्रपटाचे पोस्टरच एकदम 'रफ अँड टफ' असून पोस्टरमध्ये पिळदार शरीरयष्टी असलेला एक तरुण बोटीवर पाठमोरा उभा दिसत आहे.  त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अशाच वादळांना आणि संघर्षांना तो त्याच्या शैलीने सामोरे जाणार असल्याचे तो देहबोलीतून सांगत आहे. आता त्याच्या आयुष्यात नेमकं काय घडतंय, हे जाणून घेण्यासाठी मात्र काहीकाळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.