सटवाई जन्मतःच नशीब लिहून ठेवत असते. अशाच नशीबाची अनोखी गोष्ट "सटवाई" या चित्रपटातून उलगडणार असून सुरज झांजगे निर्मित, दिनेश विजय शिरोडे दिग्दर्शित या चित्रपटाचं चित्रीकरण जानेवारी २०२१ मध्ये सुरू होत आहे. 

टॅगडॉग मीडिया आणि षष्ठीज फिल्म्स अँड एंटरटेन्मेंट यांनी "सटवाई" या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचं टीजर पोस्टर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं आहे. 'जगातील सर्वांत सुंदर दिसणारी स्त्री' अशी या चित्रपटाची टॅगलाईन असल्याचं पोस्टरवरून दिसून येत आहे. त्यामुळे चित्रपटात नक्कीच हटके कथा मांडली जाणार असं म्हणता येईल. स्वाभाविकपणे चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. 

चित्रपटाची कथा, कलाकार आणि तंत्रज्ञ कोण हे अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही. मात्र प्रेक्षकांसाठी या चित्रपटात काही सरप्रायझेस नक्कीच मिळतील. टप्प्याटप्प्याने या चित्रपटाचे अन्य तपशील जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती दिग्दर्शक दिनेश विजय शिरोडे यांनी दिली.