“पैंजण कानामध्ये छुनु छुनु वाजतेय” या गाण्यात नटखट अदा दाखवून, ‘अशी कशी’ या रोमँटिक गाण्यातून सर्वांना प्रेमात पाडून, ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर सर्वांना हसवून अभिनेत्री मोनालिसा बागल आता ‘भिरकिट’च्या सवारीला निघाली आहे. सोशल मिडीयावर नवरात्री विशेष ९ रंगाचे फोटोशूट करुन मोनालिसा गेले काही दिवस चर्चेत राहिली होतीच. पण “सच्चा लव है, तो मुमकीन है... स्वागत तो करो हमारा” असं म्हणत तिने इंस्टाग्रामवरुन तिच्या
नव्या सिनेमाची हिंट दिली होती. 

अनेकांना हे सरप्राईज नक्कीच जाणून घ्यायचं असेल. तर मोनालिसाचं स्पेशल सरप्राईज म्हणजेच ‘भिरकिट’.अनुप जगदाळे लिखित आणि दिग्दर्शित ‘भिरकिट’ हा मोनालिसा बागलचा आगामी सिनेमा आहे. या सिनेमाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले असून तिच्या चाहत्यांनी तिचं दणक्यात स्वागत आणि कौतुक केलं आहे आणि तिच्या या नव्या सिनेमासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. आणखी एक सरप्राईज यातून मिळाले आहे ते म्हणजे ‘सैराट’ फेम तानाजी गालगुंडे. तानाजी देखील या सिनेमाचा भाग आहे आणि या सिनेमाच्या निमित्ताने तानाजी आणि मोनालिसा पहिल्यांदा स्क्रिन शेअर करणार आहेत. ‘भिरकिट’चे मोशन पोस्टर पाहता ते सर्वांचं लक्ष स्वत:कडे वेधून घेण्यास नक्की यशस्वी होईल असा विश्वास वाटतो.

उडणारा धुरळा, स्कूटर, हाती कलश, हवेत उडणारी ओढणी, मोनालिसाच्या चेह-यावरील स्मित हास्य, सोबतीला तानाजी आणि बॅकग्राऊंडला जबरदस्त म्युझिक या सर्व गोष्टी कमालीची उत्सुकता वाढवत आहेत. पण सर्व काही अजूनही गुलदस्त्यात असल्यामुळे मोनालिसाकडूनच या सिनेमाची पुढील माहिती कधी मिळते याची प्रतिक्षा करावी लागेल. क्लासीक एंटरप्राईज प्रस्तुत या सिनेमाची निर्मिती सुरेश जामतराज ओसवाल आणि भाग्यवंती ओसवाल यांनी केली आहे. या सिनेमाच्या पुढील अपडेटसाठी प्रेक्षक वर्ग नक्कीच आतुर असेल.