पहिल्याच पोस्टर पासून ज्या चित्रपटाची चर्चा सर्वत्र सुरु होती तो चित्रपट म्हणजे आणि.. डॉ.काशिनाथ घाणेकर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला. उत्तम अभिनय,योग्य दिग्दर्शन,समजेल ,कळेल असे लेखन,जिवंत अभिनय म्हणजे काय हे तुम्हाला आणि डॉ.काशिनाथ घाणेकर हा चित्रपट पाहून समजेल.

व्यवसायाने डेंटिस्ट असलेले घाणेकर मराठी रंगभूमीवर नावलौकिक कमवत होते परंतु शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या वडिलांच्या नजरेत स्वतःला सिद्ध करण्यात कमी पडले. डॉ.काशिनाथ घाणेकर सारख्या अभिनेत्याचे बहुस्तरीय व्यक्तिमत्व सादर करणे हा खूप कठीण टास्क आहे परंतु लेखक दिग्दर्शक अभिजित देशपांडे आणि घाणेकरांना पुन्हा एकदा मोठ्या स्क्रीन वर जिवंत करण्याचे धाडस केले आहे.

नट ते सुपरस्टार बनण्याचा प्रवास म्हणजे हा चित्रपट. डोक्यात प्रसिद्धी ची हवा गेल्यावर प्रेक्षकांच्या बदलणाऱ्या नजरा म्हणजे हा चित्रपट. रंगभूमीसाठी असलेली निष्ठा आणि अथक परिश्रम म्हणजे आणि डॉ,काशिनाथ घाणेकर हा चित्रपट.
४ दशक आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावून सोडणारे डॉ.काशिनाथ घाणेकर ह्यांचा चरित्रपट करण्यासाठी आजच्या काळात सुबोध भावे पेक्षा दुसरा कोणी कलाकार नाही हे लक्षात येते. जसे घाणेकरांनी त्या काळात प्रेक्षकांना तिकीटबारीवर खेचून आणले तसेच ह्या काळात सुबोध भावेने प्रेक्षकांना तिकीट बारीवर खेचून आणले.

सुबोध भावे,प्रसाद ओक, सोनाली कुलकर्णी,आनंद इंगळे,मोहन जोशी,सुमीत राघवन ह्यांनी साकारलेल्या प्रभाकर पणशीकर, डॉ. श्रीराम लागू, सुलोचना दिदी, भालजी पेंढारकर ह्यांच्या भूमिका देखील खूप सुंदर पद्धतीने मांडण्यात आल्या आहेत. वैदेही परशुरामी ने साकारलेली कांचन घाणेकर ह्याची भूमिका देखील शेवट पर्यंत लक्षात राहते. ह्या भूमिका हुबेहूब वाटण्याचे श्रेय अजून एका व्यक्तीला जाते ते म्हणजे चित्रपटाचे रंगभूषाकार.

सुबोध भावे नेहमीच बायोपिक बनवतो असे बोलणारे बरेच असतील. परंतु एखाद्या भूमिकेचा सखोल अभ्यास करून ती प्रेक्षकांसमोर जिवंत कशी करायची हे सुबोध भावे ने ह्या चित्रपटातही सिद्ध करून दाखवले आहे. अमृता खानविलकर आणि प्राजक्ता माळी ह्यांनी केलेली गाणीही चित्रपट बघताना सुंदर वाटतात.

शेवटी काय एका नटाच्या आयुष्याचा संपूर्ण प्रवास आपल्याला बघायला मिळतो. मराठी प्रेक्षकांसाठी हि दिवाळीची उत्तम भेट असणार आहे. त्यामुळे हा चित्रपट एकदातरी चित्रपटगृहात जाऊन बघाच. आणि..डॉ.काशिनाथ घाणेकर ह्या चित्रपटाला itsmajja.com तर्फे ४ स्टार्स.