विजय तेंडुलकर यांच्या समर्थ लेखणीतून अनेक नाटकं उभी राहिली. इतर साहित्याबरोबरच नाटकांतूनही त्यांचे समाजातील दोषारोपांवर खणखणीत वार होत असत. स्फोटक विषय आणि पारंपरिक तंत्राला धक्का देणारा नाट्यबंध विजय तेंडुलकर यांच्या लेखनातील प्रयोगशील जाणिवांचा अविभाज्य भाग होता. विशिष्ट तत्त्वज्ञानाचा, विचारसरणीचा ठसा नाकारून तेंडुलकर मनस्वीपणे लिहीत गेले. त्यांनी लिहिलेली 'शांतता कोर्ट चालू आहे', 'सखाराम बाईंडर', 'घाशीराम कोतवाल', 'माणूस नावाचे बेट', 'मधल्या भिंती', 'सरी गं सरी', 'एक हट्टी मुलगी', 'अशी पाखरे येती', 'गिधाडे', 'छिन्न' आदी नाटके रूढ सामाजिक संकेतांना, तसेच नाट्यसंकेतांना हादरा देणारी आणि वादग्रस्त ठरली. त्यांचे अजून एक प्रभावशाली नाटक म्हणजे 'झाला अनंत हनुमंत'. आता यावर त्याच नावाचा चित्रपटही बनतोय. 

कोरोना म हामारीमुळे मरगळलेली मराठी चित्रपटसृष्टी पुन्हा उभारी घेऊ पाहत आहे. ‘पुनश्च हरिओम’ म्हणत या चित्रपटाने एक पाऊल पुढे टाकत, चित्रीकरण सुरु करण्याच्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. सध्या प्रचलित असलेल्या प्रथेप्रमाणे निर्मात्यांनी कलाकारांची नावे गुलदस्त्यात ठेवली असून चित्रपटाचे नाविन्यपूर्ण ‘टायटल-पोस्टर’ प्रसारित केले आहे. या ‘फर्स्ट-लूक’ मधील अवकाशात सूर मारणाऱ्या मनुष्यामुळे चित्रपटाविषयी कुतूहल नक्की निर्माण होते. 
वास्तविकतेला धरून चालणाऱ्या ‘झाला अनंत हनुमंत’ या चित्रपटाची कथा एका सामान्य माणसाच्या आयुष्यावर बेतली आहे. गरिबीत राहणाऱ्या त्याची बायको कटकट करीत असते, मुलगा सतत आजारी पडत असतो, मुलीवर बडेजावाचा प्रभाव पडलेला असतो आणि झटपट श्रीमंत होण्यासाठी लटपटी खटपटी करणारा मेव्हणा असतो. या सर्वांमुळे त्याचे आयुष्य निरस झालेले असते. अचानक एका अंधश्रद्धेमुळे असे काही घडते की त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाते. 

मिना शमीम फिल्म्स प्रस्तुत ‘झाला अनंत हनुमंत’ ची निर्मिती मुन्नावर शमीम भगत यांनी केली असून, दिग्दर्शनही त्यांचेच आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी रुजू होईल.