डोंबिवली फास्ट या सुपरहिट ठरलेल्या चित्रपटामधून, आपल्या दिग्दर्शक कार्यक्षेत्रामध्ये पदार्पण करणारा एक प्रतिभावंत दिग्दर्शक आणि अभिनेता निशिकांत कामत यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली असल्यामुळे त्यांना उपचारासाठी हैदराबाद हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. निशिकांत यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती दिली होती, आणि आज त्यांचं निधन झालं आहे.
निशिकांत कामत यांनी डोंबिवली फास्ट या चित्रपटांमधून आपल्या कार्यक्षेत्राची सुरवात केली. आणि त्यानंतर ब्रेक न घेता, निशिकांत कामत यांनी अनेक वेगवगळ्या कलाकृती आपल्यासमोर सादर केल्या, ज्यामध्ये आपण लय भारी या मराठी चित्रपटाचं सुद्धा नाव घेतो. फक्त मराठी नाहीतर २००६ मध्ये मुंबई इथे झालेल्या बॉम्बस्फोटावर आधारित मुंबई मेरी जान या चित्रपटाचे दिग्दर्शन सुद्धा निशिकांत कामत यांनी केले होते. त्याच सोबत हिंदी मधील फोर्स, दृश्यम, मदारी, जुली २, डॅड्डी यांसारख्या चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले होते. रॉकी हँडसम या चित्रपटामधील निशिकांत कामत यांनी साकारलेला खलनायक आज सुद्धा सगळ्या प्रेक्षकांच्या आठवणीत आहे. निशिकांत यांच्या डोंबिवली फास्ट चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाला होता. आपल्या चित्रपटामधुन सामाजिक बांधिलकी जपणारे आणि वास्तवादी अभिनय करणाऱ्या, रुईया कॉलेजच्या निशीला भावपूर्ण श्रद्धांजली...