आपल्या दिग्दर्शनातून नेहमीच प्रेक्षकांना काही तरी नवीन आणि वेगळं देण्याच्या प्रयत्नामध्ये असणारा दिग्दर्शक आदित्य सरपोतदार याने त्याच्या चित्रपटांमार्फत सगळ्या प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ऍक्शन, सीन्सच्या माध्यमातून प्रेक्षकांना कथेशी खिळवून ठेवणाऱ्या या दिग्दर्शकाने आपल्यासमोर क्लासमेट्स, माऊली, फास्टर फेणे यांसारख्या चित्रपटांची मेजवानी सादर केली. आणि आता आदित्य सरपोतदार आपल्यासाठी अजून एक नवा कोरा चित्रपट घेऊन येत आहे. आणि तो चित्रपट म्हणजे, झोंबिवली... 

प्रेक्षकांचे आगळ्या-वेगळ्या पध्दतीने मनोरंजन करण्यासाठी मराठीतला पहिला झॉम-कॉम सिनेमा ‘झोंबिवली’ पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. सारेगम प्रस्तुत आणि Yoodlee Films निर्मित ‘झोंबिवली’ या सिनेमाचा मुहूर्त नुकताच मुंबई येथे पार पडला असून, या सिनेमाचे पहिले-वहिले पोस्टर नुकतेच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आले आहे. ब-याच कालावधीनंतर मराठी सिनेमात हॉरर-कॉमेडी पाहायला मिळणार आहे. आजपर्यंत आपण बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये झोंबिवर आधारित सिनेमे पाहिले आहेत...पण मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच झोंबिवर आधारित सिनेमा बनतोय. आणि याच हॉरर-कॉमेडी चित्रपटामध्ये आपल्याला अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि वैदेही परशुरामी हे तीन कसलेले आणि युथ आयकॉन असलेले कलाकार दिसणार आहेत. नुकतंच अमेय वाघ, ललित प्रभाकर यांनी  त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर झोंबिवली चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. आणि या पोस्टरमध्ये दोन्ही बाजूला डोंबिवली लिहलेले पाण्याचे टँकर दिसत आहे, आणि यावरूनच हि कथा डोंबिवलेली मध्ये घडणार असल्याचे कळून येते.  तूर्तास तरी पुढच्या वर्षी आपल्याला हॉरर आणि कॉमेडी या दोन्ही गोष्टींचं उत्तम समीकरण अनुभवायला मिळणार आहे यामध्ये काही वाद नाही.