छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या शूर पराक्रमी मावळ्यांचा इतिहास आपल्या समोर मांडणारा, आजच्या दमाचा दिग्दर्शक दिग्गपाल लांजेकर नेहमीच आपल्या समोर इतिहासाची एक वेगळी बाजू घेऊन येतो. मग त्यामध्ये 'फर्जंद’ मधील कोंडाजी फर्जंद यांचा पराक्रम असो किंवा मग ‘फत्तेशिकस्त’ मधील पहिली सर्जिकल स्ट्राईक, दिग्गपाल लांजेकर त्याच्या दिग्दर्शकीय दृष्टिकोनातून आपले मनोरंजन करत असतो. 

आणि यावेळी सुद्धा दिग्गपाल लांजेकर प्रेक्षकांसाठी अजून एक पराक्रमाची गाथा रुपेरी पडद्यावर साकारणार आहे. आणि ते म्हणजे ‘जंगजौहर’ हा त्याचा आगामी चित्रपट, नुकतंच या चित्रपटाचे नवीन पोस्टर दिग्गपालने सोशल मिडिया साईटवर शेअर केले आहे. पन्हाळगडाला सिद्दी मसूदने वेढा दिला, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका करून त्यांना सुखरूप विशालगडा पर्यंत पोहचवण्याचे काम करणाऱ्या, आणि पावनखिंड अमर करणाऱ्या बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या साथीदारांची हि गोष्ट आपल्याला 'जंगजौहर’ या चित्रपटामध्ये बघायला मिळणार आहे. 'ते फकस्त ६०० व्हते...  अशी जबरदस्त टॅगलाईन असणारे हे नवे पोस्टर आपल्या भेटीला आले आहे. दिग्दर्शक दिग्गपाल लांजेकर याची, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याच्या इतिहासावरील हि तिसरी कलाकृती असून, आधीच्या दोन चित्रपटांप्रमाणेच हा चित्रपट सुद्धा प्रेक्षकांचं मनोरंजन करेल आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाची एक नवीन गाथा आपल्याला बघायला मिळेल या मध्ये काही वाद नाही. तूर्तास तरी या चित्रपटामध्ये बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका यांची भूमिका कोण साकारेल ? हे मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.