सध्या मराठी कलाकार हे खुप चांगल्या पद्धतीने, सोशल मिडियावर सक्रिय आहेत. मग त्यांचा नवीन प्रोजेक्ट असो किंवा एखाद्या नवीन चित्रपटाची माहिती या साऱ्यांसाठी  कलाकार सोशल मिडियाचा वापर करतात. आणि सध्या काही मराठी कलाकार त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर OMT असं पोस्ट करत, प्रेक्षकांना त्याचा फुल फॉर्म विचारत होते.

नुकतंच कलाकारांनी या OMT चा फुल फॉर्म सुद्धा आपल्या समोर जाहीर केला आहे.  'ऑनलाईन माझं थिएटर' असा याचा फुल फॉर्म असून, बऱ्याच मराठी कलाकारांनी ही पोस्ट केली आहे. सध्या लॉकडाऊनमुळे सारे नाट्यगृह बंद आहेत, आणि यामुळे प्रेक्षकांना त्यांच्या पसंतीच्या नाटकांना मुकावं लागत आहे. पण आता ऑनलाईन माझं थिएटर, या द्वारे  आपण घर बसल्या आपल्या आवडत्या नाटकांचा अनुभव घेऊ शकतो. सुनील बर्वे यांच्या सुबक आणि Wide Wings Media मार्फत हा एक नवा कोरा आणि भन्नाट कार्यक्रमाचा आस्वाद आपले प्रेक्षक घेऊ शकतात. सुनील बर्वे यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 'ऑनलाईन माझं थिएटर' संदर्भातली एक विडिओ शेअर केली आहे. ज्यामध्ये संकर्षण कऱ्हाडे, मिलिंद पाठक, भार्गवी चिरमुले, शुभांकर तावडे, आरोह वेलणकर, ऋतुजा बागवे,  अलका कुबल यांसारख्या अनेक कलाकारांचा समावेश असणार आहे. येत्या ४ जुलै ला हा कार्यक्रम ऑनलाईन झूम ऍप द्वारे सगळीकडे प्रदर्शित होणार असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा या कार्यक्रमाचे प्रेक्षपणं होणार आहे. ज्यामध्ये अमेरिका, युरोप आणि दुबई या देशांचा सुद्धा समावेश आहे. लॉकडाऊन मध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी, सगळ्या मराठी कलाकारांनी एकत्र येऊन हा नवीन उपक्रम सुरु केला आहे. आणि नेहमी प्रमाणे या नव्या उपक्रमाला प्रेक्षक सुद्धा तेवढाच चांगला प्रतिसाद देतील यामध्ये काही वाद नाही.