प्रसाद ओक हा एक उत्तम अभिनेता आणि परिपूर्ण दिग्दर्शक आहे. कच्चा लिंबू, हिरकणी यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दशन करत प्रसाद ओकने स्वतःला एक दिग्दर्शक म्हणून सिद्ध केलं आहे. पण या व्यतिरिक्त प्रसादला गायनाची सुद्धा आवड आहे.आणि याबद्दलचं सोपं उदाहरण म्हणजे झी मराठी वर प्रदर्शित झालेला सा रे ग म प, हा कार्यक्रम. 

प्रसाद ओक हा सोशल मीडियावर सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने ऍक्टिव्ह आहे.  १३ वर्षपूर्वी प्रसाद ‘सारेगमप युद्ध ताऱ्यांचे स्वप्न सुरांचे’ या कार्यक्रमात सहभागी झाला होता. आणि नेहमीप्रमाणे इथे सुद्धा प्रसाद ओकने बाजी मारत अजिंक्यतारा हा खिताब मिळवला. या गोष्टीला आज १३ वर्षे पूर्ण झाली, आणि नुकतंच प्रसादने त्याचीच आठवण इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. या कार्यक्रमाचे काही फोटो त्याने शेअर करत, “सुरांनी मंतरलेले दिवस...युद्ध ताऱ्यांचे स्वप्न सुरांचे,सारेगमप, आज 13 वर्ष पूर्ण झाली. रसिकांच्या आणि मित्रमंडळींच्या प्रेमळ आशीर्वादानी मी "अजिंक्यतारा" झालो.आयुष्यातला एक अविस्मरणीय क्षण.” असं कॅप्शन देत हे फोटो शेअर केले आहेत. अभिनय आणि दिग्दर्शनामध्ये तर प्रसाद तरबेज आहेच, पण सुरांच्या बाबतीत सुद्धा प्रसाद अव्वल असल्याची महती त्याने आपल्या समोर सादर केली आहे.