सध्या सगळीकडे कोरोनाने थैमान घातले आहे.  गेले ३ महिने सारेजण आपल्या घरामध्येच लॉकडाऊन झाले आहेत, आणि याचा परिणाम सगळीकडे सारखाच झाला आहे. या लॉकडाऊनमुळे चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग पूर्णपणे बंद झाले होते, आणि म्हणूनच सगळ्या वाहिनींवर जुन्या मालिकांचे पुनः प्रेक्षेपण आणि सध्या सुरु असणाऱ्या मालिकांचे रिपीट एपिसोड दाखवण्यात येत होते. 

पण लॉकडाउनच्या चौथ्या आठवड्यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या आदेशानुसार काही प्रमाणात शिथिलता आणण्यात आली आहे. आणि सोशल डिस्टिंगचे पालन करत, पुन्हा एकदा मालिका आणि चित्रपटाच्या शूटिंगला परवानगी सुद्धा मिळाली आहे. गेले तीन महिने सगळ्याच चित्रपटाची किंवा मालिकेची शूटिंग बंद होती. पण आता महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत, शूटिंग साठी दिलेल्या नियमांचे पालन करत कलाकार सुद्धा नव्या दमाने तयार झाले आहेत. आणि नुकतंच याबद्दलची बातमी कलर्स मराठीच्या इंस्टाग्राम पेजवरून देण्यात आली आहे. सुमित पुसावळे, मृणाल दुसानीस,शशांक केतकर, अशोक फळ देसाई म्हणजे आपले लाडके बाळूमामा,  हे मन बावरे मधील अनु, सिद्धार्थ आणि जीव झाला येडापीसा मधील शिवा यासगळ्यांनी #NaviUmedNaviBharari हे भन्नाट हॅशटॅग वापरून पुन्हा एकदा शूटिंगला सुरवात होत असल्याची गोड बातमी प्रेक्षकांना दिली आहे. तब्बल तीन महिन्यानंतर सगळ्या मालिकांची शूटिंग सुरु होणार आहे. आणि याचाच अर्थ  पुन्हा एकदा आपल्याला, आपल्या आवडत्या मालिकांचे नवीन एपिसोड बघायला मिळणार आहेत. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाचे सगळ्या कलाकारांनी आभार मानले आहे. आणि कलाकारांना मिळालेल्या या संधीचं सोनं करत पुन्हा एकदा हे सारे कलाकार प्रेक्षकांचं मनोरंजन करतील यामध्ये काही वाद नाही.