सध्या लॉकडाउनच्या काळात आपल्या घरामध्ये राहून, आपल्या प्रेक्षकांचे मनोरंजन कसे करता येईल, प्रेक्षकांना समोर काय वेगळं सादर करता येईल, या धडपडीमध्ये आपले मराठी कलाकार लागले आहेत. आणि दरवेळेला प्रत्येक मराठी कलाकार आपल्यासमोर काही तरी नवीन आणि इंटरेस्टिंग असं सादर करत आहे. आपल्या विनोदाने आणि अचूक टायमिंगने सगळ्या प्रेक्षकांना हसवत ठेवणारा आणि आपल्या अभिनयाने सगळ्यांना भुरळ पाडणारा अभिनेता म्हणजे समीर खांडेकर, या मराठी कलाकाराने त्याच्या वेळेचा खुप चांगल्या पद्धतीने वापर केला आहे. 

लॉकडाउनच्या काळामध्ये आपण सारेजण आपल्या घरामध्ये बंद झाले आहोत, पण घरी राहून सुद्धा आपल्या मनोरंजनाची सगळी जवाबदारी मराठी कलाकारांनी घेतली आहे. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून समीरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर कवितांचा संग्रह सुरु केला आहे. ज्यामध्ये कवी कुसुमाग्रज, ग. दि. माडगूळकर, आणि भा.रा. तांबे यांसारख्या कवींच्या काही खास कवितांचं वाचन, समीर आपल्या समोर करत आहे. ज्यामध्ये कवी कुसुमाग्रज यांची पर्वणी, ग.दि.माडगूळकर यांची कुंभारासारखा गुरु यांसारख्या विशेष कवितांचा समावेश आहे. नुकतंच समीरने इंस्टाग्राम अकाउंटवर, सध्याच्या परिस्थितीला अनुसरून एक कविता सादर केली आहे. सोडून गेलेल्या त्याचा अचानक व्हिडीओ काॅल आला, असं कॅप्शन देत समीरने  हि कविता आपल्या समोर सादर केली आहे. ओळखलंस का मित्रा मला, असे कवितांचे बोल असून, आताच्या गंभीर परिस्थितीवर भाष्य करणारी हि कविता समीर आपल्यासमोर घेऊन आला आहे. वैजू नं १, लव्ह लग्न लोचा, काहे दिया परदेस या मालिकां मध्ये काम करत, अनेक नाटकांमधून सुद्धा समीरने आपले मनोरंजन केले आहे.