लोककला, नाटक, आणि सिनेमा यासगळ्याच क्षेत्रांमध्ये स्वतःच्या नावाची एक वेगळी छाप सोडत आपल्या मराठी लोककलेचा डंका सगळी कडे वाजवणारा एक उत्तम दिग्दर्शक आणि लोकमंचाची जाण असलेला कलाकार म्हणजे केदार शिंदे, आपल्या करियरची सुरवात लोककला मंचापासून करत, पुढे नाटक क्षेत्रामध्ये आपल्या नाटकांनी सगळ्या प्रेक्षकांना हसत ठेवणाऱ्या या दिग्दर्शकाने सगळ्यांची मनें जिंकली. 

सध्या लॉकडाउनच्या काळामध्ये सामान्य माणसापासून कलाकार सुद्धा आपल्या घरामध्ये बंदिस्त झाले आहेत. या लॉकडाउनच्या काळात केदार शिंदेने त्याच्या इंस्टग्राम अकाउंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत. आपल्या करियरची सुरवात करत असताना केदारने सगळ्यात आधी शाहीर म्हणून काम केले, आणि त्यानंतर नाटक, मालिका आणि चित्रपट या क्षेत्राकडे आपला दौरा वळवला. केदार शिंदेने त्याच्या प्रत्येक फोटोसोबत त्या फोटोची आठवण आणि एक किस्सा सुद्धा प्रेक्षकांसाठी शेअर केला आहे. मग त्यामध्ये १९९१ मध्ये हौशी हौशी रंगमंच संघटने मध्ये काम करत असतानाचा भरत जाधव, अंकुश चौधरी या कलाकारांसोबतचा त्याचा फोटो असो किंवा, १९९१ मधील आभास - भास हि एकांकिका यांसारखे अनेक फोटो केदार शिंदेने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे. फक्त एकांकिका नाही तर, 'श्रीयुत गंगाधर टिपरे' या भन्नाट मालिकेमधील काही आठवणी, किंवा 'बकुळा नामदेव घोटाळे' हा सिद्धार्थ जाधवचा पहिला चित्रपट त्यामधील त्या दोघांचा फोटो असे खूप सारे फोटो आणि त्यामागचे रोचक किस्से केदार शिंदेने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. लॉकडाउनच्या काळात आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत केदार शिंदेने आपल्या समोर खुप साऱ्या आठवणी सादर केल्या. फक्त आठवणी नाही तर त्याने आपल्यासमोर कलामंच आणि त्यामधील नातं सुद्धा आपल्यासमोर सादर केलं. गेला उडत, सही रे सही, लोच्या झाला रे, आमच्या सारखे आम्हीच यांसारखे नाटकं आणि जत्रा, अग बाई अरेच्चा, गलगले निघाले यांसारखे विनोदी चित्रपट अश्या खूप साऱ्या कलाकृती केदार शिंदेने आपल्या समोर सादर केल्या आहेत, आणि यानंतर सुद्धा अश्याच कलाकृती आपल्याला केदार शिंदेकडून बघायला मिळतील यामध्ये काही वाद नाही.