"स्वराज्यरक्षक संभाजी" मालिकेमधून आपल्या समोर "छत्रपती शिवाजी महाराजांची" भूमिका गाजवणारे अभिनेते 'शंतनू मोघे' यांसोबत आम्ही खास संवाद साधला आहे, जाणून घेऊया काय बोलले शंतनू मोघे...


एक कलाकार म्हणून शिवाजी महाराजांची भूमिका साकारत असताना, माणूस म्हणून स्वतः मध्ये काय बदल झाला ?

सर्वप्रथम शिवाजी महाराजांची भूमिका साकारणं ती भूमिका आपल्याला करायला मिळणं हेच भाग्य आहे माझ्यासाठी असं मी सांगतो. प्रत्येकासाठी एक स्वप्नवत भूमिका असते अशीच हि भूमिका माझ्यासाठी सुद्धा होती.जेव्हा एखाद्या युगपुरुषाचे भूमिका आपल्या वाट्याला येते तेव्हा ती निभावण्यापेक्षा त्याचा समाजावर किती परिणाम होईल हे महत्वाचं असतं आणि त्यानुसार आपली जवाबदारी वाढते. छत्रपती शिवाजी महाराज जर आपल्याला लोकांपर्यंत पोहचवायचे असतील तर त्यांचे बाह्यरूप नाही तर त्यांचे विचार सुद्धा प्रेक्षकांपर्यंत पोहचले पाहिजे. आणि या सगळ्यासाठी एक गोष्ट महत्वाची असते आणि ती म्हणजे वाचन तुम्ही जेवढं वाचन कराल तेवढं तुम्ही त्या भूमिकेशी समरस व्हाल. आपल्याला नेहमी सांगितलं जातं कि, शिवाजी महाराज वाचायला खूप सोपे आहेत, सांगायला खूप सोपे आहेत. पण त्यांचं आचरण कारण त्यांचा विचार आपल्या रोजच्या जीवनात आत्मसात करणं हे खूप कठीण आहे. आणि सध्या आपण साऱ्यांनी त्यांचे विचार आपल्यामध्ये उतरवायला सुरवात केली पाहिजे. माझ्या दृष्टीने महाराजांमधील २ गुण मला खूप भावले आणि ते म्हणजे त्यांचं व्हिजन, एक जहागिरदाराचा मुलगा, एक मोठं स्वप्न बघतो. आणि एवढं मोठं स्वप्न बघून ते सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करतो, हि खूपच कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि मला तर असं वाटतं कि असं व्हिजन सध्या आपल्याकडे नाही आहे. किंबहुना ती दूरदृष्टी माझ्याकडे सुद्धा नाही आहे. जेव्हा आपण बाहेर जाऊन समाजासाठी काही तरी करतो, आपल्या विचारांमुळे, आपल्या प्रयत्नांमुळे एखादी कोणती गोष्ट बदलली आहे का ? हे बघणं सुद्धा तेवढ्याच महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, मला तर वाटतंय हि गोष्ट आपण सगळ्यांनी आत्मसात केली पाहिजे, आणि ती म्हणजे महाराज त्यांचा कोणताच निर्णय घाई मध्ये घेत न्हवते. संपूर्ण विचार करुंन महाराज त्यांचा निर्णय सांगायचे. आणि त्याच्या या निर्णयाला सारेजण सहमत सुद्धा असायचे. आणि सध्याच्या काळात आपण साऱ्यांनी हा गुण आपल्या अंगी बाळगला पाहिजे. म्हणजेच काय तर, वेळ घ्या पण कधीच चुकीचा निर्णय घेऊ नका.

अमोल कोल्हेंनी महाराजांची भूमिका साकारून ती एका वेगळ्या उंचीवर घेऊन ठेवली आहे. आणि त्यानंतर हि भूमिका तुम्ही साकारली, काय विचार होता हि भूमिका साकारताना किंवा दडपण वगरे काही आलं का ?

माझ्या मते मी स्वतःला खूप सुदैवी समजू शकतो कारण, या मालिकेचा निर्माता अमोल कोल्हे होता. आणि याआधी मी आम्ही दोघांनी एकत्र खूप कामे केली आहेत. आम्ही 'रणभूमी' नावाचा एक चित्रपट केला होता, 'बंधमुक्त' नावाचं एक नाटक केलं होता, आम्ही दोघांनी 'जाणता राजा शिवछत्रपती' हि कलाकृती सारकारली होत. असे अनेक प्रोजेक्ट आम्ही एकत्र केले आहेत.आणि जेव्हा ''स्वराज्यरक्षक संभाजी' हा प्रोजेक्ट सुरु झाला तेव्हा, फक्त अमोलचा असा होता कि, ज्याला माझ्यावर पूर्ण विश्वास होता कि शिवाजी महाराजांची भूमिका कोण साकार करेल तर तो म्हणजे शंतनू, अनेकांनी अमोलला खूप सारे प्रश्न विचारले, त्याला अजून मोठी नावं सुचवली, पण अमोल एक अशी व्यक्ती होती ज्यानी माझ्यावर पूर्णपणे विश्वास दाखवला आणि तुमच्यासमोर मी शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आलो. ज्या व्यक्तीने याआधी छत्रपती शिवाजी महाराज हि भूमिका अजरामर करून ठेवली आहे. त्याच व्यक्तीचा माझ्यावर एवढा विश्वास असणं इथेच मी माझी अर्धी लढाई जिंकलो होतो. आणि याच गोष्टीमुळे मला कधी दडपण जाणवलं नाही. त्यानंतर झी मराठीने माझ्या नावावर शिक्का मोर्तब केला, त्यानंतर आमचे दिग्दर्शक, संवादलेखक या साऱ्यांची मदत मला खूप झाली. मला तर लेखक आणि दिग्दर्शकांनी सांगून ठेवलं होत कि, मला जर कोणत्याही संदर्भात मदत लागली, तर ते दोघेही किंबहुना सारेजण माझ्यासाठी तयार होते. आणि इतकी जेव्हा आपल्याला समोरून मदत येते, तेव्हा दडपण येणं चुकीचं आहे. परत यामध्ये सांगायचं झालं तर, अमोलनी जी भूमिका आपल्यांसमोर सादर केली ती एका योध्याची भूमिका होती, आणि यामध्ये जी भूमिका सादर झाली त्यामध्ये एक योध्यासोबत एक कर्तव्यदक्ष राजा सुद्धा दाखवण्यात आला.  महाराज फक्त हातात तलवार घेऊन नसायचे, तर याउलट ते एक मुलगा सुद्धा होते, पती सुद्धा होते आणि एक वडील सुद्धा होते. आऊसाहेबां समोर असणारा एका मुलगा, महाराजांच्या तिन्ही राण्यांसमोर समोर असणारा एक पती हे सारं काही प्रथमच या मालिकेमधून सादर झालं. आणि महाराजांचे असे अनेक पैलू मला सादर करता आले. यामुळे कधीच कोणालाच असं वाटायला नको, एखाद्यानी हि भूमिका साकारली आहे तर मी कशी करू ? किंबहुना माझ्यानंतर सुद्धा एखादा अभिनेता येईल जो महाराजांची भूमिका माझ्या पेक्षा जास्त चांगली साकारू शकतो. इथे शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व जरी अनेक असलं तरी पण महाराजांच्या दृष्टिकोनाचे पैलू वेगवेगळे असे होते.

या आधी महाराजांची भूमिका हि एक योद्धा आणि एक राजा म्हणून समोर आली होती. पण या मालिकेमध्ये एका वडील आणि मुलामधील नातं आम्हाला बघायला मिळालं. काय सांगाल या बद्दल ?

जेव्हा या भूमिकेसाठी माझं कास्टिंग झालं, तेव्हा माझ्याकडे खूप कमी वेळ होता. आणि जो काही वेळ होता तो सगळा वेळ मी वाचनासाठी लावला. आम्ही जेव्हा मी महाराजांबद्दल वाचत होतो. तेव्हा मला कळून आलं कि एकदा माणूस कसा असावा याच उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जेव्हा तुम्हाला हळवे व्हायचे आहे तेव्हा तुम्ही हळवे  होता, आणि जेव्हा तुम्हाला कठोर व्हायचं आहे तेव्हा तुम्ही कमालीचे कठोर होता, जेव्हा तुम्हाला राज्य सांभाळायचे आहे तेव्हा तुम्ही वेगळे असता. आणि जेव्हा तुम्ही घर सांभाळायला जाता तेव्हा संपूर्णरीत्या तुम्ही वेगळे असता, हे सारं काही जेव्हा तुम्ही सांभाळता तेव्हा तुमची तारे वरची कसरत असते. आणि महाराज सुद्दा या परिस्थितीमधून गेले आहेत. पण ते कधीच डगमगले नाही. एक राजा म्हणून शिवाजी महाराज अनेक प्रसंगांमधून गेले होते, ज्यामध्ये  पुरंदरचा तह, मिर्झा राज्यांसोबतचा सगळ्यात मोठा तह करण्यात आला, आपल्या पोटच्या मुलाला ओलीस ठेवणं यासगळ्या परिस्तिथीमधून सुद्धा महाराजांनी त्यांच्या बुद्धीचातुर्य आणि कुशाग्र लढाईवृत्तीने सारं काही पुन्हा आपल्या हातात घेतले.  मला तर असं वाटतं कि, लोकांसाठी लढणारा हा एकमेव राजा होता. शिवाजी महाराज नेहमीच रयतेसाठी लढले, आऊसाहेबांचा शब्द होता कि, प्रत्येक माणसाने त्याच्या राज्यात स्वतःच्या जिद्दीवर आणि कोणाच्याच दडपनाखाली जगता कामा नये. आणि हाच शब्द  छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्ध करून दाखवला. 


स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेमध्ये, पन्हाळ गडावरची शिव - शंभू भेट हा प्रसंग आजसुद्धा सगळ्यांच्या स्मरणात राहणारा आहे. तुमच्या मनात कशी भावना होती हा प्रसंग साकारताना ?

माझ्या या संपूर्ण प्रवासामध्ये मला आवडलेला आणि आज सुद्धा लक्षात असणारा सिन म्हणजे शिव शंभू भेट, एकूणच याची तीन कारण आहेत पाहिलं कारण म्हणजे या भेटी साठी झालेली वडील आणि मुलामधील ताटातूट, आणि यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला प्रचंड संवेदनशील व्हावं लागत. दुसरी म्हणजे आपल्या स्वराज्यसाठी आपल्या पोटच्या मुलाने जे काही सोसलं आहे. ते सगळं काही त्याच्या स्वतःच्या स्वार्थसाठी नाही आहे तर, हे सारं काही फक्त स्वराज्यासाठी आहे. म्हणजे शिवाजी महाराज जे काम करत होते, तेच काम त्यांचा मुलगा सुद्धा करत आहे आणि ते सुद्धा त्यांच्या पेक्षा कित्येक पटीने  जास्त जोशात. आणि एवढ्या दिवसानंतर आपला मुलगा आपल्याला भेटणार आहे हि सुखद भावना, यानंतर सगळ्यात शेवटची पण खूप महत्वाची गोष्ट म्हणजे प्रताप गंगावणे सरांचे संवाद, हि सुद्धा खूप मजबूत आणि खंबीर बाजू होती या साऱ्या प्रसंगासाठी किंबहुना मी तर सांगीन कि, संपूर्ण मालिकेसाठी प्रताप गंगावणे सरांनी जे संवादलेखन केलं आहे ते खूपच कमालीचं आणि अफलातून असं आहे. कारण आम्ही जेव्हा कधी सेटवर जायचो तेव्हा आमचं असं असायचं कि, आज आम्हाला काय नवीन वाचायला मिळेल आणि आज आम्हाला कोणते नवीन संवाद मिळतील. कारण सरांच्या शब्दांमध्ये जी ताकद आहे तीच ताकद आमच्या भावनांमध्ये उतरवाण्याचा प्रयत्न करत होतो. आणि यामुळेच एक कवी आणि एक लेखक श्रेष्ठ होतो. आणि या भेटीमागचा शिवाजी महाराजांचा असणारा विचार, प्रताप सरांनी लिहून ठेवलेला हा प्रसंग आणि  अमोल सारखा तगडा कलाकार हे सारं काही या प्रसंगाला खूप रोमांचक आणि अविस्मरणीय असं बनवल. गेली १० वर्ष मी या क्षेत्रामध्ये काम करत आहे, पण या एका प्रोजेक्टने मला खूप काही दिल आहे. राहिला प्रश्न अमोलचा, आम्ही सगळ्यांनी त्याला खूप जवळून बघीतल आहे. आठ वर्ष एक व्यक्ती फक्त आणि फक्त संभाजी महाराजांवर काही तरी करण्याच्या तयारीमध्ये असतो. आणि जेव्हा आपल्या मित्राच स्वप्न सत्यात उतरत असतं. तेव्हाची एक भावना खूप वेगळी असते.

सर आत्ता लॉकडाऊनच्या काळात पुन्हा एकदा स्वराजरक्षक संभाजी मालिकेचं पुनःप्रेक्षपण होत आहे. आता हि मालिका बघताना असं कधी वाटलं का ? हा सिन मी अजून चांगल्या पद्धतीने साकारू शकत होतो ?

असा विचार सगळया कलाकाराच्या मनात येतो. आणि आता मला बघताना खरंच खूप वेळा असं वाटतं असतं कि, हि जागा कुठे तरी सुटली आहे. मी अजून  चांगल्या पद्धतीने  हे करू शकत होतो. पण जेव्हा हि मालिका सुरु होती तेव्हा मी माझे सीन्स बघायचो, आणि जिथे माझी चूक मला दिसून येत असेल ती चूक, मी दुसऱ्या दिवशी नवीन प्रसंग करताना सुधारायचो. आणि आता फक्त मी एक निखळ प्रेक्षक म्हणून मी मालिका बघतो आणि त्याचा आनंद घेतो. आणि आता जर मला काही सुधारायचं असले तर, पुढे जेव्हा कधी महाराज साकारण्याची वेळ आली तर मी नक्कीच माझ्या कडून झालेल्या चुका सुधारून अजून चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करिन एवढं मात्र नक्की.

शंतनू सर या मालिकेमधील अजून दुसरी कोणती भूमिका तुम्हाला साकारायला आवडेल, किंवा अजून दुसरी कोणती ऐतिहासिक भूमिका साकारायला आवडेल ?

खरं सांगायला गेलं तर, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारायला नंतर मला तर नाही वाटतं कि, मी अजून कोणती दुसरी भूमिका साकारली पाहिजे. कारण हा माझा ड्रीम रोल होता. जेव्हा महाराजांच्या भूमिकेसाठी माझं कास्टिंग झालं, तिकडेच मी खूप श्रीमंत झालो असं बोलू शकतो.तस म्हणायला गेलं तर कवी कलश करायला आवडेल कारण अगदी शेवट पर्यंत ते संभाजी महाराजांसोबत  होते. मिर्जाराजे जयसिंग यांसारख्या चतुर बुद्धी असलेला व्यक्ती ज्यांनी शिवाजी महाराजांना तह करायला लावला त्यांचं सामर्थ्य खूप मोठं आहे. पण पुढे जाऊन मला कोणती भूमिका करायचा योग आला तर मला कर्ण साकारायला आवडेल. कारण त्याने सुद्धा खूप काही सोसलं आहे. कुंतीपुत्र असून सुद्धा त्याची आई त्याच्या सोबत नाही आहे. तो सुद्धा एक राजाच होता पण त्याला तो सन्मान कधीच मिळाला नाही. त्याची ती कळवलं त्याचा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन खरंच खूपच कमालीचा असा होता, म्हणून मला कर्ण साकारायला आवडेल. राहिला प्रश्न महाराजांच्या भूमिकेचा खरंच या भूमिकेने खूप काही मला दिल आहे. आणि याच श्रेय मी अमोल ला देतो.

छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्या आधीचा शंतनू मोघे आणि भूमिका साकारल्या नंतरचा शंतनू मोघे किती फरक पडला आहे तुमच्या मध्ये आणि तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा ?

एक वेगळ्या प्रकारची ओळख करून दिली या भूमिकेने, गेली दहा वर्षे मी या क्षेत्रामध्ये काम करत आहे. याआधी सुद्धा अनेक माणसे माझ्याकडे एक कलाकार म्हणून सेल्फी घ्यायला यायचे. पण महाराजांची भूमिका साकारायला नंतर माझे चाहते आता सेल्फी घायला घाबरतात. आणि भीती नसून त्यांची महाराजांवर असणारी श्रद्धा आणि त्या भूमिकेबद्दलच आदर आहे. कारण महाराजांची भूमिका साकारणं जेवढं माझ्यासाठी वेगळं होत, त्यापेक्षा जास्त वेगळेपण समोरील व्यक्तींसाठी आहे कारण, त्यांच्या डोळ्यामध्ये एक आदर आणि प्रेम मला दिसून येत. आधी जे होत ते फक्त ग्लॅमर होत पण आता आदर दिसतो. जेव्हा मी बाहेर जातो तेव्हा बाहेरील व्यक्तींना माझ्यासोबत फोटो काढायची हौस नसते, तर त्यांनी मला फक्त बघितलं आहे हेच त्याच्या साठी समाधानकारक असतं. 

मला तर असं वाटतं कि, वेळ जशी बदलत जाते तस नवं नवीन आपल्याला शिकायला मिळत. पण जर माणूस म्हणून आपण स्वतः कडे बघितलं तर, आपल्यामध्ये जे बदल झाले पाहिजे, जी शिस्त लागली पाहिजे हे सारं काही आपल्याला शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज वाचल्यानंतर कळून येईल. फक्त हेच नाही तर अनेक असे समाजसुधारक आहेत, ज्यांची लेखणी वाचून आपण स्वतःमध्ये बदल आणू शकतो.  मग त्यामध्ये स्वामी समर्थ आहेत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत, महात्मा जोतिबा फुले यांची शिकवणी सुद्धा आपल्याला  खूप काही देऊन जाते. आणि सगळ्यांचे थोडे विचार जरी आपण आपल्या रोजच्या दिनक्रमात आणलं तर आपण खूप काही मोठं करू शकतो एवढं मात्र नक्की.