कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देशभर भीतीच सावट पसरलं आहे. आणि या भीतीमुळे जगभरातील सारे व्यवहार ठप्प झाले आहेत. शाळा, महाविद्यालय, मॉल, चित्रपटगृह सार काही बंद झालं आहे. आणि याचा फटका चित्रपटश्रुष्टीमध्ये काम करणाऱ्या सगळ्यांना बसला आहे. ३१ मार्च पर्यंत सगळे चित्रपट आणि मालिकांचं शूटिंग थांबवण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या सारे कलाकार आपल्या घरीच बसले आहेत. पण तरी सुद्धा हे कलाकार घरी बसून काय करत आहे, याबद्दलची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना लागली आहे. 

कलर्स मराठी वरील लोकप्रिय मालिका जीव झाला येडा पिसा या मालिकेमधील मुख्य कलाकार, सिद्धी आणि शिवा म्हणजेच विदुला चौघुले आणि अशोक फळदेसाई हे दोन्ही कलाकार आपल्याला घरी त्यांचा छंद जोपासताना दिसून आले. विदुलाला झाडे लावायची आवड असल्यामुळे ती तिचा वेळ झाडांना देत आहे. आणि याउलट अशोक त्याच्या वाचनाची आवड पूर्ण करत आहे. त्याच सोबत स्वामींनी मालिकेमधील आपल्या सगळ्यांच्या आवडीचे रमा - माधव सुद्धा त्याचा छंद जोपासत आहेत. रमा म्हणजे सृष्टी तिच्या गायनाचा रियाज करते, तर चिन्मय त्याच्या वाचनाची आवड पूर्ण करतोय. कोरोनामुळे आपल्या सारखेच मराठी कलाकारसुद्धा घरामध्ये बंद झाले आहेत. पण तरी सुद्धा आपले काही कलाकार त्यांचा वेळ हा कुटुंबासाठी तर काही कलाकार योगा, जेवण बनवणे, वाचन करणे, कविता करणे यांसारख्या गोष्टींमध्ये आपला वेळ घालवत आहे. ज्यामध्ये आपण आवर्जून उमेश कामत आणि प्रिया बापट या दोन जोडीचे नाव घेऊ शकतो. नुकताच उमेशने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वर त्याचा आणि प्रियाचा फिटनेस विडिओ पोस्ट केला आहे. आणि घरी राहून सुद्धा आपण कसे फिट राहू शकतो याचे धडे आपल्या प्रेक्षकांना दिले. यांच्याच जोडीला सोनाली कुलकर्णीने सुद्धा सूर्यनमस्कार करण्याचा विडिओ आणि घरी राहून जेवण शिकण्याचे फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केले आहेत. 

कोरोनाच संकट गंभीर आहे, पण आपण सारेजण मिळून हे संकट सुद्धा दूर करू शकतो. आणि घरी राहून सुद्धा आपण आपले छंद कसे जोपासू शकतो. याच उत्तम उदाहरण आपले मराठी कलाकार आपल्याला देत आहे. कोरोनावर आपण कशी मात देऊ शकतो आणि काय केल्याने आपण कोरोनाला दूर ठेऊ शकतो याबद्दलची जनजागृती सुद्धा आपले मराठी कलाकार वेळोवेळी देत आहे.