सामाजिक, औद्योगिक, कला, क्रीडा आणि राजनैतिक पातळीपासून ते घरामध्ये काम करणाऱ्या महिलांचा सन्मान दिवस म्हणजेच, जागतिक महिला दिन. दरवर्षी ८ मार्च हा दिवस आपण, महिलांचा दिवस म्हणून साजरा करतो. त्यांचं कर्तृत्व, त्यांचं सामर्थ्य आणि त्यांचा समाजाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन या सगळ्यागोष्टींची सांगड घालत, स्वतःला सिद्ध करत या महिला नेहमीच एक वेगळी ओळख बनवून पुढे आल्या आहेत. मराठी चित्रपटश्रुष्टि सुद्धा नेहमीच महिलांचा आदर आणि त्यांचा सन्मान करत आली आहे. आणि हे सार काही आपल्याला मराठी चित्रपटांमधून दिसून सुद्धा आलं आहे. महिला सबलीकरण, आणि महिलांचं कर्तृत्व या साऱ्या गोष्टीने मराठी चित्रपट सुद्धा आपले मनोरंजन करत आले आहे. जिथे एखाद्या चित्रपटाला सुपरहिट होण्यासाठी, गाणी, गोष्ट आणि नायक महत्वाचा असतो. तिकडेच तेवढ्या धाटणीची आणि नायकाला तोडीस - तोड देणारी नायिका सुद्धा  महत्वाची असते. 

      एकंदरीत, मराठीमध्ये सुद्धा असे अनेक चित्रपट आले आहेत. जे फक्त आणि फक्त नायिकेमुळे चालले आहेत. ज्यामध्ये आपण आवर्जून मी सिंधूताई सपकाळ, पोस्टर गर्ल, न्यूड, आम्ही दोघी, आनंदी गोपाळ आणि वजनदार यांसारख्या चित्रपटांचा नाव घेऊ शकतो. अनंत महादेवन दिग्दर्शित, समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या आयुष्याचा प्रवास, मी सिंधुताई सपकाळ या चित्रपटांमधून आपल्या समोर मांडला. अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने सुद्धा सिंधुताईंची भूमिका चोखपणे निभावली आहे. प्रिया बापट आणि सई ताम्हणकर या दोन मराठीमधील अग्रगण्य अभिनेत्रींनी, वजनदार या चित्रपटांमधून महिलांचा स्वतःकडे बघण्याचा, एक वेगळाच दृष्टिकोन दाखवला. भारतामधील पहिल्या महिला डॉक्टर, आनंदी गोपाळ यांचं भावविश्व समीर विध्वंस याने आपल्यासमोर खूप चांगल्या पद्धतीने मांडले आहे. भाग्यश्री मिलिंद या अभिनेत्रीनेसुद्धा आपल्यासमोर हुबेहूब आनंदीबाई उभ्या करत स्त्री सबलीकरणाचे एक उत्तम उदाहरण आपल्याला दिले आहे. रवी जाधव दिग्दर्शित, न्यूड या चित्रपटाने महिला सबलीकरणाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. एक स्त्री स्वतः साठी, स्वतःच्या परिवारासाठी काय - काय करू शकते. आणि सगळ्या समाजाचा रोष पत्करून स्वतःला कश्या पद्धतीने धीटपणे  उभी राहू शकते हे सार काही न्यूड चित्रपटामध्ये पाहू शकतो. कल्याणी मुळ्ये आणि छाया कदम या अभिनेत्रींनी आपल्या चौकडीच्या बाहेर पडून चित्रपटामधील, यमुना आणि चंद्राआक्का हि भूमिका गाजवली आहे. पोस्टर गर्लमधून आपल्या अभिनयाने सगळ्या प्रेक्षकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सुद्धा या चित्रपटामधून स्त्री दाक्षण्य आणि महिलांचे महत्व पटवून दिले आहे. 

      फक्त मराठीच नाही तर, हिंदी चित्रपटश्रुष्टीमध्ये सुद्धा आपल्या अभिनेत्रींनी त्यांच्या नावाचा डंका वाजवला आहे. ज्यामध्ये आपण आवर्जून, रीमा लागू, माधुरी दीक्षित, राधिका आपटे, सोनाली बेंद्रे यांसारख्या अनेक अभिनेत्रींची नावे अभिमानाने घेऊ शकतो. महिला आणि त्यांच्या आजूबाजूला चालणार आपला समाज हे सार समीकर आपण नेहमीच बघत आहोत. आज ज्या पद्धतीने पुरुष सामाजिक, कला, राजनैतिक या घटकांमध्ये पुढे आहेत, त्याच प्रमाणे किंबहुना त्यापेक्षा जास्त अग्रेसर आताच्या स्त्रिया आहेत. आणि म्हणून सलाम करूया अश्या स्त्रियांना ज्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख आणि एक स्वतःच विश्व बनवलं आहे.