प्रत्येक सिनेमाचं आपलं नशीब असतं असं म्हटलं जातं. हेच नशीब त्याला कधी तिकीटबारीवर यश मिळवून देतं, तर कधी सिनेमहोत्सवांच्या माध्यमातून सिनेमाच्या जाणकारांच्या माध्यमातून पाठीवर कौतुकाची थाप मारतं... काही सिनेमे मात्र याहीपेक्षा वेगळं यश मिळवत उत्तुंग भरारी घेत सर्वांसाठी प्रेरणादायी ठरतात. अशा सिनेमांकडे सर्वांचंच लक्ष वेधलं जातं. 

लेखक-दिग्दर्शक-अभिनेता दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'फत्तेशिकस्त' हा गाजलेला मराठी सिनेमा भव्य-दिव्य यश मिळवल्यानंतर आता एक नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. तमाम शिवभक्त, मराठी जनता आणि सिनेरसिकांचा उर अभिमानानं भरून यावा अशी देदीप्यमान वाटचाल करणाऱ्या या सिनेमाचा समावेश आता 'मराठा लाईट इन्फंट्री'च्या अर्काइव्हमध्ये करण्यात येणार आहे.


 ए. ए. फिल्म्स यांच्या सहकार्याने आलमंड्स क्रिएशन्स प्रस्तुत, दिग्पाल लांजेकर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला 'फत्तेशिकस्त' हा सिनेमा १५ नोव्हेंबर २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. धमाकेदार ट्रेलर, लक्षवेधी प्रोमोज आणि रोमांचक संवादांमुळं सिनेमाबाबतची वाढलेली अपेक्षा 'फत्तेशिकस्त'नं पूर्ण करण्यात यश मिळवलं. प्रेक्षकांसह सिनेसृष्टीतील जाणकारांनी केलेल्या कौतुकाच्या वर्षावामुळं हा सिनेमा सर्वदूर पोहोचला. तिकीटबारीवरही या सिनेमानं बाजी मारली. 'फत्तेशिकस्त'च्या यशाची आजवर कधीही समोर न आलेली बाजू म्हणजे बेळगावमध्ये जवळपास ४ हजार भारतीय जवानांनी हा सिनेमा पाहिला होता.   

सैन्यदलाचं प्रशिक्षण घेणाऱ्या कॅडेट्ससोबतच सैन्यदलातील अधिकाऱ्यांनीही 'फत्तेशिकस्त'चं कौतुक केलं. हा सिनेमा त्यांना इतका भावला की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचं दर्शन घडवणारा 'फत्तेशिकस्त' आपल्या आर्काइव्हमध्ये असावा असा निर्णय 'मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट'नं घेतला आहे.

'मराठा लाईट इन्फंट्री' हे भारतीय सेनेतील सैन्यदलातील सर्वात जुनं सैन्यदल आहे. १७६८ मध्ये स्थापन झालेल्या या सैन्यदलाची ओळख सुरुवातीला 'ब्रिटिश लष्करातील जंगी पलटण' अशी होती. १८०२ च्या सुमारास याला रेजिमेंटचा दर्जा देण्यात आला. लाईट इन्फंट्री म्हणजे मोजक्या सैनिकांची चपळपणे हालचाली करणारी पलटण. बेळगावमध्ये असलेल्या या 'मराठा लाईट इन्फंट्री'च्या प्रशिक्षण केंद्रातील अर्काइव्हमध्ये 'फत्तेशिकस्त'चा समावेश करण्यात येण्यामागे एक विशेष कारण आहे. 'फत्तेशिकस्त'मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती, शिवरायांच्या अष्टावधानी नेतृत्वाची, शौर्याची महती, त्यांच्या साथीदारांचा अजोड पराक्रम, गनिमी कावे, युद्धापूर्वीची शिस्तबद्ध तयारी, शत्रूची इत्तंभूत माहिती मिळवून त्याला कोंडीत पकडण्याची कला आणि सहकाऱ्यांच्या मदतीनं गनिमावर विजय संपादन करण्याचा ध्यास या गोष्टींचं अत्यंत बारकाव्यानिशी सादरीकरण करण्यात आलेलं आहे. 

'मराठा लाईट इन्फंट्री'मध्ये सैनिकी प्रशिक्षण घेणाऱ्या प्रत्येक जवानाला छत्रपती शिवरायांची युद्धनीती प्रेरणा देणारी ठरणारी आहे. आजही जगभरातील बलाढ्य राष्ट्र ज्यांची नीती युद्धात वापरत आहेत त्या शिवरायांच्या युद्धनीतीचा अभ्यास मराठा बटालियनमधील सैनिकांना व्हावा या हेतूनं 'मराठा लाईट इन्फंट्री'च्या अर्काइव्हमध्ये 'फत्तेशिकस्त' समाविष्ट करण्यात येणार आहे.

लौकीक आणि अलौकीक पातळीवर यशस्वी झालेला, दिग्गज दिग्दर्शकांनी नावाजलेला, तिकीटबारीवर यश संपादन केलेला हा सिनेमा बेळगावच्या द ‘मराठा लाईट इन्फंट्री’ रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडीयर गोविंद कलवाड , डेप्युटी कमांडंट कर्नल पी. एल. जयराम , बेळगावचे समशेर बहाद्दूर हरोलीकर सरकार श्रीमान रमेश केशवराव रायजादे, सेनाखासखेल सत्यशीलराजे दाभाडे आदींच्या प्रयत्नांमुळं 'मराठा लाईट इन्फंट्री'मध्ये समाविष्ट होणार आहे. निर्माता अजय आरेकर - अनिरुद्ध  आरेकर यांची निर्मिती असलेल्या या सिनेमात चिन्मय मांडलेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली असून, त्यांना मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर, मृण्मयी देशपांडे, अंकित मोहन, निखिल राऊत, हरीश दुधाडे, समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे, तृप्ती तोरडमल, रमेश परदेशी, अक्षय वाघमारे, विक्रम गायकवाड, रुची सावर्ण, अश्विनी कुलकर्णी, नक्षत्रा मेढेकर, प्रसाद लिमये, अमोल हिंगे, ऋषी सक्सेना, सिद्धार्थ झाडबुके, हिंदीतील अनुप सोनी या मातब्बर कलाकारांची साथ लाभली आहे.