सध्या झी मराठी वरील, सगळ्यांच्या चर्चेचा विषय असलेली मालिका म्हणजे 'अग्ग बाई सासूबाई'. खूप कमी वेळातच या मालिकेने सगळ्या प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधानने शुभ्राची भूमिका साकारत पुन्हा एकदा चाहत्यांचे मन जिंकले आहे. आणि आता हीच शुभ्रा, बॉलीवूडच्या वारीवर निघाली आहे. अभिनेत्री तेजश्री प्रधान लवकरच हिंदी चित्रपटामधून आपल्या समोर येणार आहे. 

   नुकतंच तेजश्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर, तिच्या आगामी हिंदी चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. या चित्रपटाचे नाव ‘बबलू बॅचरल’ असं असून,  चित्रपटात तेजश्री अभिनेता शर्मन जोशीसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. आणि येत्या २० मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बबलू बॅचरल’ चित्रपटाचे दिग्दर्शन अग्निदेव चॅटर्जी केले आहे. आणि आता आपल्याला तेजश्री आणि शर्मनची केमेस्ट्री बघायला मिळेल. या आधी तेजश्री  झेंडा, शर्यत, असेही एकदा व्हावे, ती सध्या काय करते, जजमेंट या मराठी चित्रपटांमधून आपल्या समोर आली आहे. आणि नेहमीच तिने मराठी प्रेक्षकांचे  मनोरंजन केले आहे. सध्या तेजश्री झी मराठीवरील अग्ग बाई सासूबाई या मालिकेमध्ये शुभ्राची भूमिका साकारत आहे. आपल्या सासूचं दुसरं लग्न लावण्याच्या प्रयत्नामध्ये असणारी हि सून  कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी सांभाळते, हे सारं काही आपण या मालिकेमध्ये बघू शकतो.  या मालिकेमधून पुन्हा एकदा तेजश्रीने छोट्या पडद्यावर कमबॅक केले आहे. तिच्या सोबत या मालिकेमध्ये रवी पटवर्धन, निवेदिता सराफ, गिरीश ओक,आशुतोष पत्की या कलाकारांची सुद्धा मुख्य भूमिका आहे.
    'होणार सून मी या घरची'  या मालिकेमुळे तेजश्रीला, प्रेक्षकांच्या मनात एक घर बनवता आलं. या मालिकेमध्ये तेजश्री प्रधानाने, जान्हवीची भूमिका साकारली. एकटी सून आणि तिच्या ६ सासूबाई हा सारा कल्ला आपल्याला या मालिकेमध्ये बघता आला. आणि नेहमीप्रमाणे तेजश्रीने, तिच्या अभिनयाने सगळ्यांची मने जिंकली. आणि आता तेजश्रीचा हा आगामी हिंदी चित्रपट ‘बबलू बॅचरल’ हा कितपत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल हे पाहण्यात खरी रंगत असणार आहे.