आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक चित्रपट बनवण्यात आले. अनेक गाणी आली आणि अनेक मालिका सुद्धा पण या सगळ्यांमधून स्वतःच्या वेगळ्या दृष्टीने, आणि प्रेक्षकांना खऱ्या इतिहासासोबत जोडून ठेवण्याचं काम केलं ते म्हणजे, दिग्ग्जपाल लांजेकर या हरहुन्नरी दिग्दर्शकाने. छत्रपती शिवरायांच्या एका शब्दाखातर जीवाची बाजी लावणारे अनेक वीरयोद्धे या भूमीने महाराष्ट्राला दिले आहेत. ज्यांचे धैर्य, शौर्य आणि आवेश पाहून शत्रूही थबकला होता अशा झुंजार बांदल सेनेच्या आणि नरवीर बाजीप्रभूंच्या अजोड पराक्रमाचा अध्याय उलगडून दाखविणाऱ्या ‘जंगजौहर’  या ऐतिहासिक चित्रपटाचा मुहूर्त नुकताच स्वराज्याच्या राजधानीत म्हणजे किल्ले रायगडावर ढोल-ताशांच्या गजरात व मंत्रोच्चाराच्या जयघोषात संपन्न झाला. ‘आलमंड्स क्रिएशन्स’ निर्मित ‘जंगजौहर’ जून महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

     नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांचा पराक्रम इतिहासात अजरामर आहे. पावनखिंडीचा रणसंग्राम घडून कित्येक वर्षाचा काळ लोटला असला तरी या रणसंग्रामाचा आणि बाजीप्रभूंच्या पराक्रमाचा, बलिदानाचा इतिहास आजही प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. पन्हाळगडाला सिद्दी जोहरने वेढा दिला, तेव्हा छत्रपती शिवाजीराजे यांनी मोठ्या शिताफीने स्वत:ची सुटका करुन घेऊन विशाळगडाकडे कूच केले. पाठलागावर असलेल्या विजापूरी सैन्याचा धोका लक्षात घेत बाजींनी महाराजांना पुढे जाण्यास सांगितले. बाजी व फुलाजी हे दोन्ही बंधू बांदल सेनेसह घोडखिंडीत सिद्धीच्या सैन्याविरोधात महाकाळ म्हणून उभे ठाकले. हजारोच्या सैन्याचा मुकाबला करताना बाजी आणि ३०० बांदल सेनेच्या वीरांनी पराक्रमाची शिकस्त करत महाराज विशालगडावर पोहचेपर्यंत घोडखिंड प्राणप्रणाने लढवली. छत्रपतींना वाचवताना बांदल सेना व बाजीप्रभू पन्हाळगडाच्या थरारात धारातीर्थ झाले आणि घोडखिंडीतला हा लढा बाजीप्रभू यांच्या स्वराज्यनिष्ठेच्या पवित्र रक्ताने ‘पावन’ झाला.

सह्याद्री प्रतिष्ठान आयोजित किल्ले शिवनेरी ते किल्ले रायगड शिवरथ यात्रेचा सांगता समारोह रायगडावर पार पडला. या सोहळ्यात शिवपालखींच्या पूजनांनंतर जंगजोहर चित्रपटाच्या संहितेचे पूजन संपूर्ण टिमच्या उपस्थितीत दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि अभिनेता चिन्मय मांडलेकर यांच्या हस्ते करण्यात आले.  याप्रसंगी अंकित मोहन, हरीश दुधाडे, ऋषी सक्सेना, विक्रम गायकवाड, रोहन मंकणी आणि सुश्रुत मंकणी आदि कलाकार उपस्थित होते.

फर्जंद आणि फत्तेशिकस्त नंतर दिग्ग्जपाल लांजेकरने जंगजोहर या चित्रपटाच्या निर्मितीच शिवधनुष्य आपल्या खांद्यावर घेतले आहे. तूर्तास तरी या चित्रपटामध्ये बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत कोण दिसेल हे तरी गुप्त ठेवण्यात आलं आहे. पण जंगजोहर हा चित्रपट सुद्धा फर्जंद आणि फत्तेशिकस्त सारखाच गाजेल यात काही वाद नाही.