प्रेक्षकांना फॅन्ड्री, सैराट सारखे दर्जेदार चित्रपट देणारे दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांची, 'पावसाचा निबंध' हि शॉर्टफिल्म मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट ठरली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे नेहमीच एक वास्तवादी दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांचा प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि त्यामधून तयार झालेली कलाकृती हे सार काही त्यांना, इतर दिग्दर्शकांपेक्षा वेगळं बनवते. मुंबईतील फिल्म्स डिव्हीजन येथे 16 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात, पावसाचा निबंध या लघुपटाने, सर्वोत्कृष्ट शॉर्टफिल्म हा मानाचा पुरस्कार पटकावला आहे. 

       पिस्तुल्यानंतर, पावसाचा निबंध या शॉर्टफिल्मने अनेक पुरस्कार स्वतःच्या नावावर केले आहेत. पावसाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन आणि त्यामधून मिळणारा बोध हे सार काही या लघुपटामध्ये दाखणवण्यात आले आहे. आपल्या दिग्दर्शकीय करियरची सुरवात करत असताना, नागराज मंजुळे यांनी फॅन्ड्री चित्रपटापासून केली, आणि पुढे जाऊन सैराट हि कलाकृती आपल्यासमोर सादर केली. जिथे फँड्रीने या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारात आपल्याला नावाचा डंका वाजविला, तिकडेच सैराट या चित्रपटाने सगळ्या महाराष्ट्राला वेड लावून सोडलं. फक्त महाराष्ट्राचं नाही तर आंतरराष्ट्रीय थिएटरमध्ये सुद्धा सैराटच्या नावाचा बोलबाला झाला. आपलं वास्तववादी दिग्दर्शन, कलाकारांकडून  काम करून घेण्याची शैली या सगळ्याचं गोष्टींमुळे नागराज मंजुळे यांनी  प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं घर तयार केलं आहे. 

       सैराट चित्रपटाच्या यशानंतर नागराज मंजुळे यांनी 'पावसाचा निबंध' हि शॉर्टफिल्म बनवली. आणि पिस्तुल्या प्रमाणेच या शॉर्टफिल्मला सुद्धा भरपूर प्रेम मिळाले. २०१७ मध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यामध्ये सुद्धा पावसाचा निबंध लघुपटाने, सर्वोत्कृष्ट शॉर्टफिल्म आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक या पुरस्कारावर आपल्या नावाचा शिक्कामोर्तब केला. आणि आता नुकताच पार पडलेल्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुद्धा सर्वोत्कृष्ट शॉर्टफिल्म हा खिताब आपल्या नावावर केला. याच दरम्यान नागराज मंजुळे यांचा, बॉलीवूड मधील शेहेनशहा अमिताभ बच्चन यांसोबतच बहुचर्चित असा 'झुंड ' चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. मराठी चित्रपटश्रुष्टी प्रमाणेच हिंदीमध्ये सुद्धा नागराज मंजुळे यांच्या नावाचा डंका वाजला जाईल या मध्ये काहीच वाद नाही.