झी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेनं अल्पावधीतचं प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. सुरुवातीपासूनच या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं. कुठलीही ऐतिहासिक भूमिका प्रेक्षकांना पटेल अशी निभावणं हे कलाकारासाठी आव्हानात्मक असतं आणि तीच भूमिका सहजरित्या निभावणं हे त्या कलाकाराचं यश आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र संभाजी महाराजांचा इतिहास प्रेक्षकांच्या डोळ्यांपुढं उभा करण्यात यशस्वी झालंय.अल्पावधीतच लोकप्रिय झालेली ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. सूत्रांकडून मिलेल्या माहितीनुसार या मालिकेचा शेवटचा भाग नुकताच चित्रित करण्यात आला. जवळपास २ वर्ष या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. या मालिकेतून संभाजी  महाराजांच्या आयुष्यातील महत्वाच्या घडामोडींवर, तसेच बारीकसारीक प्रसंगांवर प्रकाश टाकण्यात आला. डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेली संभाजी यांची भूमिका, तसेच शंतनू मोघे यांनी साकारलेली शिवाजी महाराजांची भूमिका आणि प्राजक्ता गायकवाडने साकारलेली येसूबाईंची भूमिका यांनादेखील प्रेक्षकांचे तितकेच प्रेम मिळाले. फेब्रुवारीमध्ये या मालिकेचा अखेरचा भाग प्रसारित होणार अशी माहिती मिळाली आहे. या मालिकेची जागा कुठली मालिका घेणार अजूनही गुलदस्त्यात आहे.