आपल्या मधुर आवाजाने भावगीतांसह, मराठी आणि हिंदी चित्रपटातील गाण्यांना बहारदार साज चढवणारे गायक, सुरेश वाडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.  ये जिंदगी गले लगा ले, चप्पा चप्पा चरखा चले, सपने मैं मिलती हैं, पाहिले न मी तुला यांसारख्या सदाबहार गाण्यांना आपला आवाज देत, सगळ्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारनं पद्म पुरस्काराची घोषणा केली. आणि त्यामध्ये सुरेश वाडकर यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे. 

        मराठीसह हिंदी, इंग्रजी, उर्दू, पंजाबी या भाषांची उत्तम जाण असणारे सुरेश वाडकर म्हणजे एक अष्टपैलू व सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्त्व आहे.  सुरेश वाडकरांना ‘गमन’ या चित्रपटात पहिल्यांदा गाण्याची संधी मिळाली होती. आणि त्यानंतर चित्रपटामधील गाण्यानंतर सुरेश वाडकर लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचले. त्यानंतर त्यांनी आपल्या संगीत कारकिर्दीत शेकडो गाणी गायली. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताची परंपरा टिकावी यासाठी सुरेश वाडकर यांनी आजीवासन गुरुकुलम नावाची संस्था सुरू केली. आणि याच संस्थेमधून अनेक नव्या दमाचे गायक आपल्या चित्रपटश्रुष्टीला मिळाले. फक्त हिंदी, मराठी, उर्दू, पंजाबी या भाषेपर्यंत मर्यादित न राहत, सुरेश वाडकर यांनी भोजपुरी, मल्याळी, पंजाबी, बंगाली, सिंधी या भाषेसाठी संगीत दिले आहे. आणि याचीच पावती म्हणून, २०११ पार पडलेल्या नॅशनल फिल्म्स अवॉर्ड्स मध्ये, सुरेश वाडकर यांना हे भास्कर क्षितिजावरी या, गाण्यासाठी बेस्ट प्लेबॅक सिंगरचा पुरस्कार मिळाला. मराठी भावगीतांचा चेहरा म्हणून ओळखले जाणारे सुरेश वाडकरांनी मराठी आणि हिंदी चित्रपटाला सुद्धा तेवढेच महत्व दिले. ज्यामध्ये आवर्जून मुंबई पुणे मुंबई, हैदर, एक विवाह ऐसा भी, प्रेमग्रंथ, रंगीला, चांदणी यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. त्याच सोबत अनेक गेम शोमध्ये सुद्धा सुरेश वाडकर यांनी परीक्षक म्हणून काम केले आहे. लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, अनुराधा पौडवाल, सुधीर फडके यांसारख्या दिग्गजांसोबत काम करत, सुरेश वाडकर यांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. 

        सुरेश वाडकरांसहित, पंडित मणिलाल नाग यांना सुद्धा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचसोबत श्री छन्नूलाल मिश्रा आणि श्री अजोय चक्रबोर्ती यांना पद्माभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.