मराठी अभिनेते किव्हा अभिनेत्री हिंदी चित्रपटात काम करत आहेत हि गोष्ट आता नवीन नाही, महत्वाचं म्हणजे हिंदी चित्रपटातही आपले कलाकार हे महत्वपूर्ण भूमिका करताना आपल्याला दिसून येतात. १९८३ च्या विश्वचषक स्पर्धेवर आधारित 83 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आणि ह्या चित्रपटात क्रिकेटपटू संदीप पाटील ह्यांची भूमिका त्यांचाच मुलगा म्हणजेच अभिनेता चिराग पाटील साकारणार आहे. 83 ह्या चित्रपटातील त्याचा लूक नुकताच सोशल मीडियावर रिव्हिल करण्यात आला आहे, आणि वडिलांप्रमाणेच अगदी सारख्या दिसणाऱ्या चिरागची सर्वत्र चर्चा होत आहे. 


'वजनदार' या मराठी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारा हॅण्डसम अभिनेता चिराग पाटील आता बॉलिवूडच्या पीचवर षटकार ठोकायला सज्ज झाला आहे. १९८३ विश्वचषक स्पर्धेवर आधारित '83' या चित्रपटातून तो प्रेक्षकांसमोर येणार आहे. कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटात तो त्याचे वडील तसेच ८३ विश्वचषक विजेत्या भारतीय संघांतील शिलेदार क्रिकेटपटू संदीप पाटील यांची भूमिका साकारणार आहे. आपल्या वडिलांचीच भूमिका मोठ्या पडद्यावर चिरागने साकारणं म्हणजे प्रेक्षकांसाठी हि एक मेजवानीच ठरेल, आता चिराग हि भूमिका कशी पेलतोय हे बघणे खूपच रंजक ठरेल. 


नुकताच या सिनेमातील चिरागचा पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. 'लूक अ लाईक संदीप पाटील' दिसणाऱ्या चिरागचा हा पोस्टर नेमका मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावरच प्रदर्शित झाला असल्याकारणामुळे दिवसाची सुरुवात गोड ने झाली आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका रणबीर सिंग साकारत आहे. तरी, प्रेक्षकांसाठी चिरागला वडील संदीप पाटील यांच्या भूमिकेत पाहणे रंजक ठरणार आहे.