सध्या सोशल मीडियात चर्चा आहे ती प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित चोरीचा मामला या चित्रपटाची... मल्टीस्टारकास्ट असलेल्या या चित्रपटात अभिनेता जितेंद्र जोशी एका अतरंगी भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील जितूचा लूक पोस्टरद्वारे प्रसिद्ध करण्यात आला असून आता जितूचा एक टिझर देखील प्रदर्शित करण्यात आला आहे.

"मस्का" या चित्रपटानंतर प्रियदर्शन जाधवचा दिग्दर्शक म्हणून चोरीचा मामला हा दुसरा चित्रपट आहे. एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट प्रस्तुत आणि स्वरुप स्टुडिओजच्या सहकार्याने सुधाकर ओमळे, आकाश पेंढारकर, सचिन नारकर, विकास पवार, स्मिता ओमळे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रियदर्शननंच चित्रपटाचं लेखन, चिनार महेश यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. ३१ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

जितूनं चित्रपटात नंदन व्यक्तिरेखा साकारली आहे. जितूसह अनेक कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांत दिसतील. या सर्वांचे लूूूक टप्प्याटप्प्याने समोर येणार आहेत. मस्का चित्रपटातून प्रियदर्शननं त्याच्या दिग्दर्शनाची छाप पाडली होती. आता चोरीचा मामला काय आहे, ते लवकरच कळेल.