चौकटीबाहेरचा विचार करत सातत्याने वैविध्यपूर्ण कलाकृती देणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये समित कक्कड यांचे नाव आवर्जून घेतले जाते. ‘हुप्पा हुय्या’, ‘आयना का बायना’, ‘हाफ़ तिकीट,’  ‘आश्चर्यचकीत’  यांसारखे वेगळ्या धाटणीचे चित्रपट देणाऱ्या समित यांनी ताकदीचा आशय आणि तेवढ्याच ताकदीची तांत्रिक सफ़ाई दाखवून आपल्या चित्रपटांचा दर्जा सातत्याने उंचावत नेला. त्यामुळेच त्यांच्या आगामी चित्रपटांविषयी कायमच उत्सुकता राहिली आहे. त्यांचा ‘३६ गुण’ हा चित्रपट नवीन वर्षात म्हणजेच २०२० साली प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाच्या पोस्टरची पहिली झलक नुकतीच प्रदर्शित करण्यात आली आहे.

लेखकाला नक्की काय सांगायचंय? याबाबत दिग्दर्शकाचा दृष्टिकोन स्पष्ट असेल तर या दोघांच्या समीकरणातून घडणारी कलाकृती नक्कीच आशयघन ठरते. अशाच समीकरणातून लेखक हृषिकेश कोळी आणि दिग्दर्शक समित कक्कड यांचे जुळलेले ’३६ गुण’ त्यांच्या चित्रपटांतूनही दिसून येताहेत. या दोघांच्या सॅालिड कॉम्बीनेशन’ चा ‘३६ गुण’ प्रेक्षकांसाठी काहीतरी भन्नाट असणार याची खात्री बाळगायला हरकत नाही. 


लेखक दिग्दर्शकाची कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायला चांगले नट असतील तर त्या कलाकृतीला ‘चारचाँद’ लागतात. ‘३६ गुण’ या चित्रपटात संतोष जुवेकर व पूर्वा पवार हे दोघे युवा कलावंत मध्यवर्ती भूमिकेत दिसणार असून आजच्या तरुण पिढीच्या नातेसंबंधाच्या मानसिकतेवर आणि त्यांच्या दृष्टीकोनातून भारतीय लग्नसंस्थेवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. मुंबई आणि लंडनमधील तब्बल ९० नयनरम्य लोकेशन्सवर हा सिनेमा चित्रीत झालेला असल्याने आतापर्यंत न पाहिलेले लंडन आणि वेगळा विषय ही प्रेक्षकांसाठी ‘स्पेशल ट्रीट’ ठरणार आहे.

‘समित कक्कड फ़िल्म्स’ व ‘द प्रॊडक्शन हेडक्वार्टर्स लि’ प्रस्तुत आणि समित कक्कड, मोहन नाडार, संतोष जुवेकर आणि सावित्री विनोद गायकवाड निर्मित सिनेमाचं छायाचित्रण प्रसाद भेंडे यांचे आहे.