व्ही बी. प्रॉडक्शनच्या आगामी मराठी चित्रपट ‘भुतियापंती’ चे निर्माते विनोद बरदाडे, नरेश चव्हाण आणि यशवंत डाळ असून दिग्दर्शनाची धुरा संचित यादव यांनी सांभाळली आहे. ह्या चित्रपटातील ‘मोरया’ हे गाणे नुकतेच प्रकाशित करण्यात आहे. त्या गाण्याची खासियत म्हणजे प्रसिद्ध ‘शिंदेशाही’ गायक आनंद शिंदे यांनी ते गायलं आहे आणि त्यांनी मराठी चित्रपटासाठी गायलेले पहिलेच गणपती गाणे आहे. आनंद शिंदे यांचा वैशिष्टपूर्ण आवाज असलेले गाणे सध्या सुरु असलेल्या गणेशोत्सव महोत्सवात खूपच गाजतंय. 

खरंतर गणपतीच्या आगमनाच्या सुमारास अनेक ‘गणपती’ गाणी येत असतात परंतु ‘भुतियापंती’ मधील ‘मोरया’ या गाण्याने रसिकांचे मन जिंकले आहे. गीतकार स्वप्नील चाफेकर ‘प्रीत’ यांचे बोल गाण्याला वास्तववादी बनवतात तसेच संगीतकार अभिनय जगताप यांचं कर्णमधुर संगीत भक्तिसंगीताचा उत्तम नमुना आहे असं मत जाणकारांनी व्यक्त केलंय.

‘भुतियापंती’ च्या निर्मात्यांनी गणेशोत्सवाचं औचित्य साधून चक्क गणपतीबाप्पाला आपल्या चित्रपटात सामावून घेतलेय याबद्दल त्यांचं सर्वबाजूंनी कौतुक होताना दिसतंय. गीतकाराने चपखल शब्दांमध्ये गणपती बाप्पा हे सर्वांचेच कसे लाडके दैवत आहे, हे अधोरेखित केले आहे व आनंद शिंदेंच्या आवाजाने हे गाणे अजूनच बहारदार झाले आहे. 

 संगीतकार अभिनय जगताप यांचे संगीत दिग्दर्शन असलेला ‘सूर सपाटा’ या वर्षी प्रदर्शित होऊन गेला. तसेच त्यांनी पार्श्वसंगीत दिलेल्या ‘टकाटक’ चित्रपटाने कोटीकोटीची उड्डाणे केली व यावर्षीच्या सर्वात जास्त कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत स्थान मिळविले. आनंद शिंदे यांनी ‘टकाटक’ साठी पार्श्वगायन केले होते व त्यांची व अभिनय जगतापांची जोडी पुन्हा ‘भुतीयापंती’ चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आली आहे.

‘भुतियापंती’ या मराठी चित्रपटातील आनंद शिंदे यांनी गायलेले ‘गणपती’ गाणे गणपती-विसर्जनाच्या वेळी आवर्जून वाजविले जात आहे.