Beed Farmer News : सध्या महाराष्ट्रात पावसाने अक्षरशः थैमान घातलं आहे. काही ठिकाणी तर पावसाने केलेल्या कहरने अनेकांचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रात पावसाने जो हाहाकार केला त्यात शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले. हे नुकसान कधीही भरुन न येण्यासारखे होते. मान्सून पूर्व पावसाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना झोडपलं. आणि याचा जबर फटका हा आपल्या शेतकरी बांधवांना बसला आहे. दिवस-रात्र काबाड कष्ट करुन आपला शेतकरी मित्र शेतात मेहनत घेत पीक उत्पादन घेतो. संपूर्ण जगाला पोसणारा हा शेतकरी स्वतःचे लाखोंचे नुकसान करत त्याच जिद्दीने पुन्हा उभा राहत शेतात नवं पीक पिकवतो. काबाडकष्ट करुन, संपूर्ण कुटुंबाला शेतात काम करायला घेऊन हे शेतकरी त्यांचा घरखर्च भागवतात.
शेतीचे नुकसान झाल्याचे अनेक व्हिडीओ आपण नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहतो. हे व्हिडीओ मनाला चटका लावून जातात. अशातच मान्सून पूर्व पावसाने घातलेल्या धुडगूसमध्ये एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान दाखविले आहे. जे पाहून अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे कारण, शेतकऱ्याची चिमुरडी लेक यावेळी झालेल्या नुकसानाची पावती वाचून दाखवताना दिसत आहे. ज्याने अनेकांचे डोळे पाणावले आहेत.

महाराष्ट्रात अति वृष्टीने त्या भाबड्या शेतकऱ्याच्या शेतातील कांद्याचे खूप नुकसान झाले आहे. ही मंडळी शेतात विखुरलेला कांदा नाही तर त्यांची स्वप्न गोळा करताना दिसत आहेत. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये, बाप-लेक आणि संपूर्ण कुटुंब शेतातील कांदा गोळा करताना दिसत आहे. यांत त्यांची पाच महिन्याची मेहनत पाण्यात गेली आहे. पावसात भिजलेला कांदा आता कोण घेणार?, या इतक्या मोठ्या शेतीचे आता काय करायचे?, हे प्रश्न आणि अश्रू त्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात दिसत होते. बीड जिल्ह्यातील एका लहानग्या गावातील हा व्हिडीओ आहे. वडिलांच्या मदतीला या चिमुरडीने धाव घेतली आहे. आपले वडील आपल्याला कांदा विकून मिळालेल्या पैशातून शाळेची फी भरणार, नवीन कपडे घेणार ही एक अशा त्या चिमुकलीच्या डोळ्यांत दिसत आहे.
आणखी वाचा – २९ जखमा, पाच-सहा वार ताजेच अन्…; वैष्णवी हगवणे प्रकरणातील मोठी माहिती, शेवटच्या श्वासापर्यंत वार आणि…
ती चिमुकली या व्हिडीओमध्ये असं बोलताना दिसत आहे की, “कांदा विकून बाबा माझी शाळेची फी भरणार होते. नवीन चप्पल घेणार होते. आलेल्या वादळात, पावसा-पाण्यात आमचे कांदे वाहून गेले. साहेब आमची तुम्ही मदत करा. आता आमचे हे खराब झालेले कांदे कोण विकत घेणार? कशी मी शाळेत जाऊ?”, अशी ती चिमुरडी निरागसतेने बोलताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ फक्त ठाकरे या युट्युब अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे.