‘कॉफी विथ करण’चा आठवा सीझन सध्या सुरू आहे. आतापर्यंत या कार्यक्रमाचे तीन भाग प्रदर्शित झाले. पहिल्याच भागात रणवीर सिंह व दीपिका पदुकोण यांनी हजेरी लावली होती. यानंतर दुसऱ्या भागात सनी देओल व बॉबी देओल हे दोघे भाऊ पाहुणे म्हणून आले होते. तर या कार्यक्रमाच्या तिसऱ्या भागात सारा अली खान व अनन्या पांडे या अभिनेत्रींनी हजेरी लावली होती. अशातच आता या कार्यक्रमाचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. नव्या प्रोमोची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
‘कॉफी विथ करण ८’च्या आगामी भागात अभिनेत्री करीना कपूर व आलिया भट्ट या दोघींनी एकत्र हजेरी लावल्याचं पाहायला मिळत आहे. नव्या भागात बॉलिवूडमधली नणंद-वहिनीची ही जोडी धमाल करताना दिसणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या प्रोमोमध्ये करण आलिया व करीनाची खिल्ली उडवताना दिसत आहे.
प्रोमोमध्ये करण करीनाला तिच्या आणि आलियामधील नात्याबद्दल प्रश्न विचारताना दिसत आहे. या प्रोमोमध्ये तो करीनाला “तू आलियाची नक्की कोण लागते? वहिनी की भावजय?” असा प्रश्न विचारतो. तेव्हा करणच्या या प्रश्नाला उत्तर देताना ती त्याला म्हणते की, “तूच सांग, तू K3G (कभी खुशी कभी गम) बनवला आहेस”. यानंतर करण आलियाला संबोधून, “करीना कदाचित तुझी वहिनी आहे” असं म्हणतो. तेव्हा करीना “मी कोणाचीही वाहिनी नाही” असं उत्तर देते. करीनाच्या या उत्तरावर आणि करणने तिला विचारलेल्या या खोचक प्रश्नावर आलियाला हसू आवरता येत नाही. त्यामुळे ती जोरात हसते.
यापुढे तो करीनाला ‘गदर २’ च्या सक्सेस पार्टीमध्ये उपस्थित न राहिल्याबद्दल विचारतो. “अमिषा पटेलबाबत तिला काही अडचण आहे” असं म्हणत तो तिला त्या दोघींमध्ये काहीतरी वाद असल्याचेही विचारतो. यानंतर करण तिला “‘गदर २’च्या सक्सेस पार्टीला का आली नाही?” असं विचारताच करीना तिचा चेहरा दुसरीकडे फिरवते. “मी तुझ्याकडे दुर्लक्ष करत आहे” असं म्हणत ती अमिषाबरोबरच्या वादाबद्दल काहीही उत्तर न देणे पसंत करते.
राकेश रोशन यांच्या ‘कहो ना प्यार है’ चित्रपटात प्रथम करीनाला मुख्य भूमिकेत घेण्यात आलं होतं. काही सीन्स करीनाने शूटही केले होते, परंतु नंतर तिने यातून काढता पाय घेतला. त्यानंतर ही भूमिका अमीषाकडे आली असल्याचे म्हटले जाते. दरम्यान ‘कॉफी विथ करण ८’च्या भागात बरीच मजा-मस्ती प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या आगामी भागासाठी प्रेक्षकदेखील उत्सुक आहेत.