मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर सध्या विशेष चर्चेत असलेला पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘झिम्मा २’, ‘ओले आले’, ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटांमुळे सिद्धार्थ विशेष चर्चेत आला. या चित्रपटांमधील भूमिकांमधून सिद्धार्थने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. सिद्धार्थचे लाखो चाहते दिवाने आहेत. अनेक तरुणाईला तर सिद्धार्थने त्याच्या सौंदर्याने भुरळही पाडली आहे. चित्रपटचं नव्हे तर अनेक गाजलेल्या मालिकांमधूनही त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिनयाशिवाय सिद्धार्थला बाईक चालवण्याची आवड होती, मात्र एका विशेष घटनेमुळे त्याच्या या आवडीचं न आवडत्या गोष्टीत रुपांतर झाले. यादरम्यानचा एक किस्सा सिद्धार्थने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितला आहे. (Siddharth Chandekar Incident)
सिद्धार्थने नुकतीच ‘व्हायफ़ळ’ या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली होती. यावेळी बोलताना त्याने बाईक हा विषय नको म्हणत त्याच्या अपघाताचा किस्सा सांगितला. हा किस्सा सांगत सिद्धार्थ म्हणाला, “मी ‘अग्निहोत्र’ मालिकेचं व ‘झेंडा’ चित्रपटाचं एकत्र चित्रीकरण करत होतो. संपूर्ण दिवसभर मी पुण्यात ‘अग्निहोत्र’ मालिकेचं शूट करायचो आणि रात्री ‘झेंडा’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला मुंबईत ठाण्यात यायचो. पहाटे ४,५ वाजेपर्यंत मी चित्रपटाचं शूट करायचो. परत पुण्याच्या दिशेने प्रवास करायचो तेव्हाच मी गाडीत झोपायचो आणि पुण्यात पोहोचल्यावर मालिकेच्या शूटिंगला जायचो. चार-पाच दिवस मी असाच शूटनिमित्त प्रवास केला. एकेदिवशी माझ्याकडे वेळ होता, मी घरी निवांत चहा पोळी खाल्ली. आणि मी माझ्या बाईकने शूटिंगच्या सेटवर जायला निघालो. थंडीचे दिवस होते म्हणून जॅकेट, हेल्मेट घातलं होतं. त्यानंतर मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा मी एका गाडीच्या बोनेटवर होतो. त्या गाडीच्या काचेच्या आत मी रुतलो होतो. माझ्या बाईककडे पाहिलं तर, पुढचं व मागचं चाक एक झालं होतं.”
पुढे तो म्हणाला, “बाईक चालवताना चक्क मला झोप लागली होती. उठून मी आधी सेटवर अपघात झाल्याचं कळवलं. त्यानंतर मी हातात घुसलेली काच वगैरे काढली. डॉक्टरांकडून जाऊन मी सेटवर पोहोचलो. तेव्हा ‘अग्निहोत्र’ मालिकेत गणेशोत्सवाचा सीन सुरु होता. तेव्हा मला जाणवलं की, आरतीसाठी टाळ्या वाजवण्यासाठी माझा उजवा हात मला वर घेता येत नव्हता. तेव्हा श्रीरंग सरांनी ते पाहिलं ते म्हणाले ‘काय झालं?’, मी बोललो, ‘मला हात उचलताच येत नाही आहे’. तेव्हा त्यांनी शर्ट बाजूला करुन पाहिलं आणि सांगितलं की, ‘तुझा हात सांध्यातून वेगळा झाला आहे.’ हे ऐकून मी स्तब्ध झालो.”
अपघाताचा हा किस्सा पुढे सांगत तो असंही म्हणाला की, “त्यानंतर डॉक्टरांकडे गेल्यानंतर बोलता बोलता अवघ्या दीड सेकंदात माझ्या शरीरात एक तीव्र कळ गेली. माझ्यासारख्या तीस लोकांना ती कळ सोसावली नसती इतकी ती कळ तीव्र होती. तेव्हा मी त्या डॉक्टरांना विचारलं हे कस केलं तुम्ही? यावर ते हसत बोलले, हे असंच करतात. त्यानंतर बाईकबद्दलची माझी आवडच निघून गेली.”