छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित अनेक चित्रपट आजवर आले आहेत. इतिहासाची साक्ष देणाऱ्या या चित्रपटांसमध्ये आणखी एका चित्रपटाची भर झालेली पाहायला मिळणार आहे. बाल शिवाजी असे चित्रपटाचे नाव असून या चित्रपटात लोकप्रिय अभिनेता आकाश ठोसर मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा पहिलं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५०व्या शिवराज्याभिषेक सोहळादिनानिमित्त या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.(Akash Thosar New Movie)
आकाश ठोसरने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या चित्रपटाचं पहिलं पोस्टर शेअर केलं आहे. यामध्ये तो तरुण छत्रपती शिवरायांच्या लूकमध्ये पाहायला मिळत आहे. आकाश ठोसर या चित्रपटात ‘बाल शिवाजी’ ही भूमिका साकारणार आहे. पोस्टरमध्ये त्याचा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा लूक पाहायला मिळतोय. हातात तलवार, कपाळावर चंद्रकोर, गळ्यात कवड्यांची माळ अन् भेदक नजर या आकाशच्या लूकमध्ये पाहायला मिळतेय.
“लहान असो वा मोठा वाघ ‘वाघच’ असतो.” महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळादिनानिमित्त सादर आहे, स्वराज्याच्या पायाभरणीची अद्भुत गाथा ‘बाल शिवाजी’ या महाचित्रपटाचे पहिले पोस्टर” असं कॅप्शन देत आकाशने हे पोस्टर शेअर केलं आहे. आकाश ठोसर अभिनित बाल शिवाजी या चित्रपटाचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव करणार असल्याचं समोर आलं आहे.(Akash Thosar New Movie)
हे देखील वाचा – छत्रपतींच्या कार्यकर्तृत्वाची असामान्य गाथा ‘सिंहासनाधिश्वर’ रुपेरी पडद्यावर
रोमँटिक चित्रपटानंतर आकाशाची ऐतिहासिक चित्रपटातील ही भूमिका पाहणं रंजक ठरेल. आकाशने शेअर केलेल्या या पोस्टरवर त्याच्या चाहत्यांनी कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.
