छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रपटांच्या यादीत सध्या अनेक चित्रपटांच्या निर्मितीची भर पडत आहे. या चित्रपटांच्या शर्यतीत एक नवीन कथा रुजली जात आहे ती म्हणजे इतिहासातील अजिंक्य राहिलेल्या रामशेज किल्ल्याची आणि तो किल्ला झुंजता ठेवणाऱ्या मावळ्यांची.(Ramshej New Movie)
छत्रपती शिवाजी महाराजांनंतर औरंगजेबाने महाराष्ट्रातील किल्ले जिंकून आपली सल्तनत बुलंद करण्याचा मनसुबा बोलून दाखवला आणि त्याची पहिली नजर पडली ‘रामशेज’ किल्ल्यावर पण हा किल्ला सर करायला त्याला एक नाही.. दोन नाही.. तब्बल साडे सहा वर्षांहून अधिक काळ लोटला तरीही किल्ला जिंकता आला नाही. केवळ ६०० मावळ्यांनी हा किल्ला प्राणपणाने जपला; तो हस्तगत करण्यासाठी शहाबुद्दीन खान, फतेह खान आणि कासम खान यांसारख्या मातब्बर सरदारांनी अक्षरशः शर्थ केली पण हाती केवळ निराशा आली.

‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’च्या यशानंतर आणि ‘मुरारबाजी’ चित्रपटाचे चित्रीकरण जोमात सुरु असतानाच निर्माते अजय आरेकर आणि अनिरूद्ध आरेकर आपल्या ‘आलमंड्स क्रिएशन्स’द्वारा ‘रामशेज’ ही चौथी कलाकृती शिवप्रेमींसाठी घेऊन येत आहेत. लवकरच ‘रामशेज’ चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे.(Ramshej New Movie)