Vaishnavi Hagawane Death Case : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण सध्या खूपच चर्चेत आलेलं पाहायला मिळत आहे. हे प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरवत आहे. पुण्यातील मुळशी येथे राहणाऱ्या वैष्णवीने हुंड्याच्या छळामुळे आत्महत्या केल्याची घटना समोर आली. हे प्रकरण इतकं पेटलं कारण छळाचा आरोप असणारे आरोपी हे राजकीय क्षेत्रात कार्यरत होते. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे राजेंद्र हगवणे यांच्या सूनेने केलेली ही आत्महत्या असल्याने राजकीय क्षेत्रातही खळबळ माजली आहे. दरम्यान, मृत वैष्णवीचे आरोपी पती, सासू-सासरे, नणंद, दीर यांना अटक करण्यात आली आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्येचा सध्या जोरदार तपास सुरु असलेला पाहायला मिळत आहे.हे प्रकरण आता इतकं पेटलं आहे की, यावर अनेक कलाकार मंडळीही प्रतिक्रिया देत आहेत.
वैष्णवीच्या मृत्यूची झळ आता सिनेविश्वातही उमटू लागली आहे. अभिनेता हेमंत ढोमेने पोस्ट शेअर करत दोषींना कठोर शिक्षा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या पाठोपाठ आता आणखी एका अभिनेत्याने वैष्णवी प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. हा अभिनेता म्हणजे पुष्कर जोग. पुष्कर जोग हा नेहमीच न पटणाऱ्या मुद्द्यांवर स्पष्टपणे भाष्य करताना दिसतो. आजवर पुष्करने अनेकदा मुद्दे मांडले आहेत आणि यावरुन नेटकऱ्यांनी त्याला बरेचदा ट्रोलही केलं आहे. मात्र पुष्कर कधीच या ट्रोलिंगला घाबरला नाही. ट्रोल करूनही तो त्याचे मुद्दे सोशल मीडियावर परखडपणे मांडताना दिसतो.
आणखी वाचा – लेकीचा छळ माहिती असून आई-वडील गप्प का राहिले?, वैष्णवी हगवणेच्या कुटुंबियांनाच दोष कारण…

वैष्णवी प्रकरणावर पोस्ट शेअर करत पुष्करने संताप व्यक्त करत म्हटलं आहे की, “खूप लाज वाटते. जे काही महाराष्ट्रामध्ये घडतंय. आधी स्वारगेट प्रकरण आता वैष्णवी. आपल्या भगिनी सुरक्षित आहेत का? आता एका मुलीचा बाप म्हणून भीती वाटते. पोस्ट टाकली की कोणीतरी ट्रोल करतंच पण, आता गप्प बसून चालणार नाही ना. माणुसकी आणि आपल्या समाजातील निरागस भगिनींचा प्रश्न आहे. गुन्हेगारांना कठोर शिक्षा द्या. Justice For all Vaishnavi “, असं म्हटलं आहे.
वैष्णवीने राहत्या घरी गळफास घेतला. मात्र ही आत्महत्या नसून तिची हत्या करण्यात आली असल्याचं कुटुंबियांकडून वारंवार सांगण्यात येत आहे. दोन वर्षांपूर्वी वैष्णवी व शशांक हगवणे यांचं थाटामाटात लग्न झालं. लग्नाला लाखो रुपये खर्चही करण्यात आले. ५१ तोळे सोनं, फॉर्च्युनर कार, महागड्या वस्तू शशांकला लग्नात देण्यात आले होते. मात्र त्यानंतरही वैष्णवीच्या कुटुंबियांकडे हगवणे यांच्याकडून पैसे व इतर वस्तूंसाठी मागण्या होतच राहिल्या आणि छळ वाढत गेला.