Vaishnavi Hagwane Death : सध्या वैष्णवी हगवणे आत्महत्या हे प्रकरण चर्चेत आलं आहे. राजकीय क्षेत्रातही या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्या सूनेने आत्महत्या केली. सासरच्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या घेण्याचा निर्णय घेतला. यामुळे तिच्या माहेरच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हुंडा, पैशांची मागणी करत हगवणे कुटुंबाने धाकटी सून वैष्णवी हिचा जाच केला आणि तिला मारहाण केली. या सगळ्याचा ताण घेत वैष्णवीने आत्महत्या करण्यासारखं टोकाचं पाऊल उचललं. या प्रकरणाअंतगर्त मृत वैष्णवीचे पती, सासू आणि नणंद यांना अटक केली आहे. तर सासरे आणि दीर फरार आहेत. हे प्रकरण सध्या चर्चेत असताना वैष्णवीच्या शेवटच्या संभाषणाची ऑडिओ फीत समोर आली आहे.
वैष्णवीने तिचे दुःख तिच्या मैत्रीणीबरोबर शेअर केले होते, याची ऑडिओ सध्या व्हायरल होत आहे. वैष्णवीने तिला नेमका काय जाच झाला हे स्वतःचं एका मैत्रिणीकडे सांगितलं होतं, त्याची ऑडिओ क्लिप ‘एबीपी माझा’च्या हाती लागली आहे. या ऑडिओमध्ये ती असं बोलताना दिसत आहे की, “आई-वडिलांना विरोध करुन शशांकबरोबर प्रेम विवाह केला, ही माझी आयुष्यातील मोठी चूक होती. आता ही चूक सुधारण्यासाठी वडील माझी साथ देणार आहेत, लवकरच मी घटस्फोट घेणार आहे. पिंकी ताईंनी (नणंद) पण माझ्यावर संशय घेतला आणि मला सहन होणार नाही इतकं काही बोलली”, असं वैष्णवीने मैत्रिणीबरोबरच्या संभाषणात सांगितलं होतं.
वैष्णवीच्या आई-वडिलांनीही लेकीच्या मृत्यूनंतर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी लेकीकडे सासरकडून होणाऱ्या सततच्या पैशांच्या मागणीबाबत, सोन्या-चांदीच्या मागणीबाबत, दोन करोड रुपये मागितल्याबाबत खुलासा केला. शिवाय त्यांनी वैष्णवीच्या मुलाला सासरी आणायला जाताच त्याचा ताबा न देता बंदुकीचा धाक दाखवत त्यांना परतवून लावल्याचंही सांगितलं. वैष्णवीच्या आई-वडिलांच्या मते ही आत्महत्या नसून गळा दाबून केलेला खूण आहे . तसेच त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी व्हावी अशी विनंती केली.
वैष्णवीचे सध्या फरार असलेले सासरे राजेंद्र हगवणे हे राजकीय पक्षातील आहेत. त्यामुळे आता पोलिसांनी कुठलाही दबाव न पाळता आरोपींना तत्काळ अटक करावी अशी मागणी तिच्या वडिलांनी केली आहे. वैष्णवीच्या शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला असून गळ्याला फास लागून मृत्यू झाल्याचे कळले आहे. तर या तपासणीदरम्यान वैष्णवीच्या शरीरावर मारलेल्याच्या जखमाही आढळल्या.