Snehal Tarde on Pahalgam Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याची झळ साऱ्या जगाला लागली. या दहशतवादी हल्ल्यात तब्बल २६ निष्पाप जीवांवर हल्ला झाला. आणि सुरुवात झाली ती भारत-पाकिस्तान युद्धात. भारताने पाकिस्तानी दहशतवाद्यांना कसलीही खबर न लागू देता मिशन ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरु केले आणि पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ नेस्तनाबूत केले. पहलगाम हल्ल्याचा बदला घेत भारताने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. हे प्रकरण वाढत गेलं आणि पाकिस्ताननेही भारतावर हल्ले करायला सुरुवात केली. या युद्धजन्य परिस्थितीत भारतीय सैन्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तर, पहलगाम हल्ल्यात जीव गेलेल्या २६ निष्पाप लोकांना देशभरातून श्रद्धांजली मिळाली.
पहलगाम हल्ल्यात ज्यांची निघृण हत्या करण्यात आली त्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पुण्यात रविवारी तिरंगा यात्रा काढण्यात आली होती. भारतीय लष्कराच्या पराक्रमाला सलाम करणे हेदेखील या यात्रेचे उद्दिष्ट होते. पुण्यातील या तिरंगा यात्रेमध्ये सहभागी होत एका मराठी अभिनेत्रीने याविषयी पोस्ट शेअर करत साऱ्यांचं लक्ष वेधून घेतले आहे. ही अभिनेत्री म्हणजे स्नेहल तरडे. स्नेहलने या यात्रेतील खास फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत पाकड्यांबाबत राग व्यक्त केला आहे तर भारतीय सैन्याला सलामी दिली आहे.
तिरंगा यात्रेवेळी अचानक पावसाची सुरुवात झाली, तरी प्रत्येक पुणेकराने त्या यात्रेत सहभाग घेत देशाप्रती असेल प्रेम दाखवून दिलं. स्नेहलने पोस्ट शेअर करत, “भारतीय सैन्यदलाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुण्यात भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. आपल्या माणसांना गमावल्याचे दुःख, भिकारड्या पाकड्याचा राग आणि दहशतवादी ठेचल्याचा आनंद अशा संमिश्र भावना बाळगून या यात्रेत मैत्रिणीसह सहभागी झाले. भारत माता की जय! भारतीय सैन्यदलाचा विजय असो”.
अभिनेत्रीने शेअर केलेल्या पोस्टवर अनेकांनी तिच्या या यात्रेतील सहभागाबद्दल आनंद व्यक्त केला. काहींनी ‘भारत माता की जय’, ‘जय हिंद’ अशा कमेंट करत पाठिंबा दर्शविला आहे. सोशल मीडियावर स्नेहल बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच देशाप्रती प्रेम दर्शविणारी स्नेहलची ही पोस्ट साऱ्यांचं लक्ष वेधून घेणारी आहे.