पाऊस पर्यावरण आणि मैत्री या नाजूक विषयावर  भाष्य करणाऱ्या 'येरे येरे पावसा' या आगामी चित्रपटाने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. नुकत्याच पार पडलेल्या 'टॉप इंडी फिल्म अवॉर्ड २०२०', टोकियो आणि जपान या चित्रपट महोत्सवामध्ये तब्बल ७ मानाची नामांकने पटकावली आहेत. आणि या नामांकनांमधून २ पुरस्कारांवर आपल्या नावाची मोहर पक्की केली आहे. 

'टॉप इंडी फिल्म अवॉर्ड २०२०' या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म, दिग्दर्शन, छायांकन, संकलन, साउंड डिझायनिंग, ओरिजनल म्युझिक स्कोर, ओरिजिनल आयडिया या विभागासाठी नामांकने मिळाली होती. आणि या नामांकनांमधून, सर्वोत्कृष्ट छायांकन आणि साउंड डिझायनिंग हे दोन पुरस्कार येरे येरे पावसा या चित्रपटाने आपल्या नावावर केले. येरे येरे पावसा या चित्रपटाच्या दिग्दर्शिका शफाक खान यांनी या पुरस्कारांबद्दल आनंद व्यक्त केला आहे. पावसाची धमाल आणि लहानांची कमाल दाखवणारा हा चित्रपट नकळत एक मोलाचा संदेश देऊन जातो. 

एस.क्यूब फिल्म्स इंडिया एलएलपी’ यांची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन शफाक खान यांनी केले आहे. चित्रपटाच्या छायांकनाची जबाबदारी योगेश एम.कोळी यांनी सांभाळली असून संकलन चंदन अरोरा यांनी केले आहे. कथा भूषण दळवी तर पटकथा शफक खान, भूषण दळवी यांची आहे. संवाद अभिषेक करगुटकर, विनोद जाधव यांनी लिहिले आहेत. अमोल पोवळे यांनी लिहिलेल्या गीतांना सुशांत पवार, किशोर पवार यांनी संगीत दिले आहे. अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांचा स्वरसाज चित्रपटातील गीतांना लाभला आहे. साऊंड चाकीर हुसैन तर कलादिग्दर्शन योगेश इंगळे यांचे आहे. या चित्रपटाची निर्मिती  शारीक खान तर सहनिर्मिती अँन्या झँग (बटरफ्लाय फिल्म्स) यांची आहे. सत्या शेट्टी, ग्यानचंद चौहान, सुमेध गायकवाड कार्यकारी निर्माते आहेत.