स्टार प्रवाहवरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ महामानवाची गौरवगाथा या मालिकेत बाबासाहेबांच्या पत्नीची म्हणजेच रमाबाईंची भूमिका साकारणार आहे अभिनेत्री शिवानी रांगोळे. शिवानीला याआधी आपण ग्लॅमरस रुपात पाहिलंय. ऐतिहासिक भूमिका साकारण्याची तिची ही पहिलीच वेळ आहे आणि त्यासाठी ती प्रचंड उत्सुकही आहे.

रमाबाई म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग. बाबासाहेबांचं उच्च शिक्षण असो, आंदोलनं असो वा सत्याग्रह रमाबाई त्यांच्यापाठीशी सावली प्रमाणे उभ्या राहिल्या आणि त्यांनी कुटुंबही सांभाळलं. महापुरुषाची सहचारिणी होण्याचं व्रत रमाबाईंनी मोठ्या निष्ठेने आणि प्रेमाने पाळलं. अश्या या थोर व्यक्तीची भूमिका साकारायला मिळणं ही खूप भाग्याची गोष्ट आहे असं शिवानीला वाटतं.

या भूमिकेविषयी सांगताना शिवानी म्हणाली, ‘माझ्या आयुष्यातली ही खूप वेगळी भूमिका आहे. अतिशय समजूतदार आणि ठेहराव असणारं हे कॅरेक्टर आहे. या भूमिकेसाठीचा पेहराव, भाषा यागोष्टीसुद्धा माझ्यासाठी नवं आव्हान आहे. धनंजय कीर आणि बाबुराव बागुल या लेखकांच्या पुस्तकांचं वाचन मी करतेय. रमाबाईंची भूमिका साकारण्यासाठी मला याचा फार उपयोग होतोय. यासोबतच दशमी प्रोडक्शन, स्टार प्रवाह वाहिनी आणि माझे सर्वच सहकलाकार यांच्या पाठिंब्यामुळे ही भूमिका साकारण्यासाठी मला मदत होतेय. रमाबाईंचं कार्य अपार आहे. त्यांचं कार्य या मालिकेतून पोहोचवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन असं शिवानी म्हणाली.’

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा बालपणापासूनचा प्रवास या मालिकेत पाहायला मिळणार आहे. त्यासाठी पाहायला विसरु नका डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही नवी मालिका. १८ मे पासून सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.